Kitchen Cleaning Tips : स्वयंपाकघरात प्लास्टिक, स्टील, अॅल्युमिनियमचे मोठे डबे असतात; ज्यात आपण विविध प्रकारचे कडधान्य, मसाले, खाण्याचे पदार्थ भरून ठेवतो. पण, रोज स्वयंपाकादरम्यान तेल आणि वाफेच्या शिंतोड्यांमुळे ते घाण आणि चिकट होतात. महिनोन महिने जर ते डबे स्वच्छ केले नाहीत, तर फार कठीण काम होऊन बसते. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा किंवा दर १५ दिवसांनी त्यांची साफसफाई करणे फार महत्त्वाचे ठरते.
मात्र, रोजची धावपळ आणि घरातील कामे यांमुळे स्वयंपाकघरातील हे डबे नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत किचनमधील हे चिकट, तेलकट डबे न घासता, न रगडता स्वच्छ करता आले तर. काय आश्चर्य वाटतेय ना? पण ही आश्चर्यजनक वाटणारी बाब प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच ट्रिक्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी १० मिनिटांत किचनमधील चिकट, तेलकट डबे आणि भांडी अगदी व्यवस्थित स्वच्छ अन् चमकदार करू शकता.
गॅस लायटरने शेगडी पेटत नाहीये? मग थांबा! फेकून देण्याआधी करुन पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक
किचनमधील चिकट, तेलकट भांडी स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स
१) बेकिंग सोडा
जर तुमच्या किचनमधील तेल आणि मसाल्यांचे डबे खूप मळकट आणि चिकट झाले असतील, तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आवश्यक आहे. एक ते दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि ते द्रावण कापूस किंवा ब्रशच्या मदतीने डबे वा भांड्यांवर लावा. आता १५-२० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर ब्रश किंवा स्क्रबरने ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने धुवा. अशा प्रकारे डब्यांवरील चिकटपणा निघून जाईल.
२) लाँड्री डिटर्जंट किंवा भांडी घासण्याचे लिक्विड
चिकट, तेलकट डबे स्वच्छ करण्याची आणखी एक ट्रिक म्हणजे तुम्ही बादलीत गरम पाणी घ्या. त्यात लाँड्री डिटर्जंट किंवा भांडी घासण्याचे लिक्विड टाका आणि चांगले मिसळा. या पाण्यात किचनमधील डबे आणि चिकट भांडी भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. सर्व वंगण आणि घाण निघून जाईल.
३) मीठ
तुम्ही हे डबे मिठानेदेखील स्वच्छ करू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडे पाणी गरम करावे लागेल. त्यात कापड बुडवून पाणी हलकेच पिळून घ्या. आता या कपड्यावर थोडे मीठ टाकून, डबे आणि झाकण पुसून घ्या. त्यामुळे घाण आणि चिकटपणादेखील निघून जाईल. असे एक किंवा दोन वेळा पुन्हा करा.
४) हॅण्ड सॅनिटायझर
तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही हे घाणेरडे डबे हॅण्ड सॅनिटायझरनेही स्वच्छ करू शकता? त्यासाठी सॅनिटायझर थेट डब्यावर टाकून किंवा कापडावर लावून मग घासून घ्या. अशाने डबे पुन्हा चमकतील.
५) अॅस्पिरिनच्या गोळ्या
तुम्ही पाण्यात अॅस्पिरिनची गोळी टाकूनही डबे स्वच्छ करू शकता. त्यासाठी पाणी गरम करून, त्यात एक किंवा दोन अॅस्पिरिनच्या गोळ्या टाकाव्यात. आता या पाण्याने डबे स्वच्छ करा. आपण या पाण्यात जार किंवा कंटेनरदेखील बुडवू शकता आणि काही तास सोडू शकता. जेणेकरून ते स्वच्छ होतील.