उत्तम आरोग्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे, असे आरोग्यतज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण मुबलक पाणी प्यायल्यामुळे वजन घटू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. दररोज मुबलक पाणी प्यायल्याने शरीरातील उष्मांकाचे ज्वलन होण्यास मदत होते, त्याच प्रमाणे साखर, सोडियम आणि कोलेस्टेरॉलच्या सेवनातही घट होते, असा निष्कर्ष अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइसच्या संशोधकांनी काढला आहे.

या संशोधकांनी १८,३०० व्यक्तींवर संशोधन केले. या व्यक्ती दररोज मुबलक प्रमाणात पाणी पीत असत. या व्यक्तींच्या ६८ ते २०५ उष्मांकाचे ज्वलन झाल्याचे आणि सोडियमचे प्रमाण ७८ ते २३५ ग्रॅमने तसेच साखरेचे प्रमाण ५ ते १८ ग्रॅमने घटल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तींचे कोलेस्टेरॉल घटल्याचेही लक्षात आले. दररोज नेहमीपेक्षा एक टक्का अधिक पाणी पिण्याने दररोजच्या उष्मांकात ८.६ टक्क्यांनी घट होत असल्याचे या संशोधकांनी सांगितले. भिन्न आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर असलेल्या तसेच वेगवेगळे वजन असलेल्या व्यक्तींमध्येही अधिक पाणी पिल्याचा सारखाच परिणाम दिसून आला, असेही संशोधकांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)