Side Effects Of Oats: आजकाल लोक त्यांच्या आरोग्याचा विचार करून आहाराची निवड करतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम सोसावे लागतात. त्यासाठी योग्य आहार घेणं ही काळाची गरज आहे. सध्या ओट्स हा लोकांमध्ये आवडता नाश्त्याचा प्रकार बनला आहे. ओटमील हे पोटभर आणि फायबरयुक्त आहार मानला जातो. मात्र, जर तुम्हाला दररोज सकाळी फक्त ओट्स खाण्याची सवय असेल तर तुमच्या नाश्त्यात काही विविधता आणण्याची गरज नक्कीच आहे.

ओट्स हे नक्कीच आरोग्यदायी आणि चविष्ट असतात. ओट्स साधारणपणे दूध, फळे, सीड्स किंवा ड्रायफ्रुट्स यांच्यासोबत खाल्ले जातात. मात्र दररोज ओट्स खाणं हे सवय काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. दररोज ओट्स खाण्याचे दुष्परिणाम आणि नेमकं कोणी ओट्स खाणं टाळायला हवं याबाबत जाणून घेऊ…

दररोज ओटस् खाणे योग्य आहे का?

न्यूट्रिशनिस्ट डॉ. पवित्रा एन राज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जर तुम्ही दररोज ओट्स खाल्ले तर या पाच गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

ग्लुटेन संवेदनशीलता

ओट्स हे ग्लुटेन फ्री असतात. मात्र, अनेक कारखाने त्यांना गहू, बार्ली किंवा राईसारख्या ग्लुटेन असलेल्या धान्यांसह प्रक्रिया करतात. यामुळे क्रॉस-कॉन्टॅमिनेशन होऊ शकते. जर तुम्हाला सेलिआक रोग किंवा ग्लुटेन अॅलर्जी असेल तर फक्त प्रमाणित ग्लुटेन फ्री ओट्सचीच निवड करा. अन्यथा तुम्हाला पोटदुखी, पोटफुगी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.

गॅस आणि पचन समस्या

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी चांगले असते. तरीही जर तुमच्या शरीराला फायबरची सवय नसेल तर जास्त ओट्स खाल्ल्याने गॅस, पोटफुगी किंवा पोट जड वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फायबरचे सेवन हळूहळू वाढवावे. थोड्या प्रमाणात सुरूवात करा आणि तुमच्या शरीराच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला अस्वस्थता न होता ओट्सचे फायदे मिळतील याची खात्री होईल.

खनिजांचे शोषण

ओट्समध्ये फायटिक अॅसिड असते, जे शरीरातील कॅल्शियम, लोह आणि जस्त यासारख्या खनिजांचे शोषण कमी करू शकते. दररोज ओट्स खाल्ल्याने पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. हे कमी करण्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी ओट्स भिजवणे किंवा आंबवणे चांगले. त्यामुळे फायटिक अॅसिडची पातळी कमी होते आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते.

वजन वाढणे

ओट्सचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असली, तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. १०० ग्रॅम ओट्समध्ये अंदाजे ३७९ कॅलरीज असतात. ओट्स, फळे आणि सुकामेवा यांनी भरलेले मोठे बाउल खाल्ल्यास कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. म्हणून प्रमाणावर लक्ष द्या आणि विशिष्ट दिवशी स्मूदी, दही किंवा भाज्यांचे ऑम्लेट निवडा.

पोषक तत्वांची कमतरता

ओट्स पौष्टिक असतात, पण ते शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे देत नाही. जर तुम्ही दररोज सकाळी फक्त ओट्स खाल्ले तर तुमच्यात प्रथिने, काही जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असू शकते. तज्ज्ञ सांगतात की, संतुलित नाश्त्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.

दररोज ओट्सचे सेवन आरोग्यदायी आहे का?

ओट्सचे अनेक फायदे आहेत, मात्र ते योग्य प्रमाणात खाणे उत्तम.
आठवड्यातून २ ते ३ वेळा ओट्स खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.