आहारात अंडय़ाच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंडय़ातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलेले असतानाच जगाच्या तुलनेत प्रत्येक भारतीय खातात वर्षभरात फक्त ३८ अंडी खातो म्हणजेच भारतातील नागरिक अंडय़ांचा वापर फारच कमी प्रमाणात करत असल्याचे दिसून येत आहे.
ऑक्टोबरचा दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या अंडय़ांचे उत्पादन वाढत असून त्या तुलनेत अंडी खाण्याचे प्रमाण फारच कमी आहेत. प्रत्येक मानवाने वर्षभरात १८० अंडी खाणे आवश्यक असताना प्रत्येक भारतीय मात्र  वर्षभरात केवळ सरासरी ३८ अंडी खातो. आहारात अंडय़ांचा वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. अंडय़ाच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते. अंडय़ाच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो, तसेच हे घटक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त ठरत असल्याची माहिती शहरातील आहारतज्ज्ञ प्रज्ञा बागलकोटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
अंडय़ांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२, तसेच फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम याचबरोबर अन्यही पोषणमूल्ये मिळतात. या विविध घटकांमुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंडय़ामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडय़ांचा वापर केला पाहिजे, असेही बागलकोटे म्हणाल्या.
नागपूर जिल्ह्य़ात दररोज पाच लाख अंडय़ाची विक्री
नागपूर शहर व ग्रामीणमध्ये दररोज पाच लाख अंडय़ांची विक्री होत असल्याची माहिती महात्मा फुले मार्केटमधील अंडय़ाचे ठोक विक्रेते मेहबूब एग्स सेंटरचे संचालक मोहंमद मलिक शेख यांनी दिली. नागपुरात हैदराबाद, करीमनगर, वारंगल, आरमोरी, कळमेश्वर, भंडारा, जबलपूर, रायपूर, बिलासपूर, येथून अंडी येतात. सर्वाधिक अंडी हैदराबादेतून आणली जातात. नागपुरात एकूण दहा ठोक विक्रेते आहेत. हे सर्व विक्रेते शहरातून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना अंडी विकतात. प्रवासादरम्यान एक टक्का अंडी फुटतात. त्याचा भरूदड व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. कोंबडीचे अंडे १५ दिवसांपर्यंत ठेवले जाते. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे अंडय़ांची लवकरच लवकर विक्री केली जाते. सध्या ठोक बाजारात अंडय़ाचे दर १०० नग ३५० रुपयाला, तर चिल्लर विक्री ४८ रुपये डझन आहे. काही ठिकाणी ती ५४ रुपये डझनानेही विकली जात आहेत. नवरात्रोत्सवात अंडय़ांची विक्री मंदावते. मात्र उत्सव संपताच मागणी वाढते. उन्हाळ्यात अंडय़ांच्या विक्रीत एकदमच घट, तर हिवाळ्यातील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या चार महिन्यात विक्रीत २५ टक्के वाढ होत असल्याचेही शेख यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every indian eats only 38 eggs in a year
First published on: 10-10-2014 at 03:46 IST