मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी मधुमेहग्रस्त अनेक उपाय करतात. मात्र दररोजच्याा शारीरिक कसरती, व्यायाम आणि शारीरिक वजनावर नियंत्रण मिळविल्यास मधुमेह आटोक्यात येऊ शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलत्या जीवनशैलीचा अट्टहास न करता सर्वसाधारण जीवनशैली अवलंबल्यास टाइप टू मधुमेहावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यासाठी वजनावर नियंत्रण मिळविले पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे आणि सकस आहार घेतला पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकादम यांनी सांगितले. ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी बेकादम बोलत होते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तंबाखूलाही प्रतिबंध केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘इंटरनॅशनल डायबेटीज फेडरेशन अ‍ॅटलास : २०१५’च्या एका अहवालानुसार भारतात जवळपास ६९.२ दशलक्ष लोकांना मधुमेह आहे, तर लोकसंख्येच्या अध्र्याहून अधिकजण मधुमेह या आजाराबाबतच अनभिज्ञ असून २० ते ७० वयोगटातील ८.७ टक्के लोकांना मधुमेह झाल्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये झालेल्या मृत्यूची एकूण आकडेवारी पाहता ९.८ टक्के मृतांपैकी २ टक्के मृत्यू हे मधुमेह आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे झालेले आहेत.

बेकादम यांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये या आजाराची तात्काळ तपासणी करणाऱ्या यंत्रणा, रुग्णांना परवडणाऱ्या दरात त्याचे निदान आणि उपचारांसोबतच रुग्णांची स्वयंव्यवस्थापन करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. कारण भारतात ३० ते ६९ वयोगटातील मधुमेहाच्या विकारांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ७९ हजार ५०० पुरुष आणि ५१ हजार ७०० महिलांचा समावेश आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exercise weight control will control diabetes
First published on: 12-04-2016 at 02:11 IST