Dandruff Remedies For Monsoon : पावसाळ्यात हवामानामुळे आपल्यातील अनेक जणांना त्वचा संसर्ग, केस गळणे, कोंडा, अपचन आणि इतर अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशा परिस्थितीत जीवाणू आणि बुरशीजन्य रोग वाढतात. पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा होणे ही एक मोठी समस्या आहे, जी बऱ्याच जणांना त्रास देते. पावसाळ्यात केस ओले झाल्यामुळे, दमट वातावरणात तुमच्या टाळूवर जीवाणूंची वाढ होऊ शकते. मग त्यामुळे परिणामी डोक्यात खूप मोठ्या प्रमाणात कोंडा होतो. केसांत मोठ्या प्रमाणात कोंडा झाल्यामुळे केसांत सतत खास येते, केस स्वच्छ न राहिल्यामुळे त्याचा चेहऱ्यावरही परिणाम होऊ लागतो म्हणजेच त्वचेवर पुरळ आणि त्वचा तेलकट दिसू लागते. पण, थोडी काळजी आणि काही उपाय केल्यास घरच्या घरी तुम्हाला या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

टी ट्री ऑइल – टी ट्री ऑइलमध्ये अँटीफंगल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात; जे बुरशीची वाढ होऊ न देण्यास मदत करतात. नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलसारख्या तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा. मग त्या मिश्र तेलाने टाळूवर मालिश करा आणि ३० मिनिटांनी केस धुऊन टाका. तुम्ही केसांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा टी ट्री ऑइल लावू शकता.

अ‍ॅलोवेरा जेल – अ‍ॅलोवेरा जेल टाळूला आराम देण्यास मदत करते. अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म त्यात असतात. त्यामुळे कोंड्यामुळे येणारी खाज कमी करण्यासदेखील मदत होते. तुम्ही कोरफडीचे जेल थेट टाळूवर लावा आणि ३० ते ४० मिनिटे तसेच राहू द्या. मग केस शॅम्पूने धुऊन घ्या.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर – अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाळूचे पीएच संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करते आणि बुरशीची वाढसुद्धा रोखते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर व पाणी समान प्रमाणात मिसळा आणि ते द्रावण शॅम्पूनंतर केसांना लावा. केस पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.

मेथीची पेस्ट – मेथीच्या बियांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते; ज्यामुळे केस मजबूत होण्यास आणि कोंड्याशी लढण्यास मदत होते. मेथीची पेस्ट दोन चमचे रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर पेस्ट बनवा आणि टाळूला लावा. ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या. तुम्ही आठवड्यातून एकदा मेथीची पेस्ट वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकिंग सोडा स्क्रब – बेकिंग सोडा त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास आणि बुरशीची वाढ कमी करण्यास मदत करतो. ओल्या टाळूवर एक चमचा बेकिंग सोडा हलक्या हाताने लावा. एक-दोन मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर तुमचे केस आणि टाळू स्वच्छ धुवा. पण, बेकिंग सोड्याचा अतिवापर करणे टाळा. कारण- त्यामुळे कोरडेपणा येऊ शकतो.