दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बराच पैसा लागतो. मग तुमच्याकडे पुरेशी बचत नसेल तर तुम्हाला कुठूनतरी उधार घेण्याची वेळ येते. मात्र उधार घेतलेल्या पैशांवर तुम्हाला ठराविक टक्के व्याजही भरावे लागते. पण आता ही चिंता दूर होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलकडून बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन या कंपन्यांनी पुढाकार घेत हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता या कर्जाची रक्कम किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या दोन्ही कंपन्यांकडून जास्तीत जास्त ६० हजार रुपये कर्ज मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० ऑक्टोबरपासून अॅमेझॉन आपला सर्वात मोठा वार्षिक फेस्टीव सिझन सेल सुरु करत आहे. तर दुसरीकडे फ्लिपकार्टही बिग बिलियन सेल सुरु करत आहे. ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही उधार मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला किती रक्कम उधार मिळू शकते हे समजू शकणार आहे. ग्राहकांची खरेदी करण्याची पद्धत आणि पेमेंट करण्याचा इतिहास यावरुन कर्जाची रक्कम मंजूर होणार आहे. याशिवाय या कंपन्यांकडून ग्राहकांना डेबिट कार्डवर ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय आणि पेबॅक गॅरंटी यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. या बिनव्याजी कर्जाच्या नवीन सुविधेबाबत अॅमेझॉन इंडियाचे मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष मनीष तिवारी म्हणाले, ‘जास्तीत जास्त ग्राहकांना ऑनलाईन खरेदीकडे वळवायचे असेल तर नवनवीन सुविधा देणे आवश्यक आहे.’ त्यानुसार कंपनी प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart and amazon offering interest free credit for shopping
First published on: 01-10-2018 at 20:31 IST