जनरल अटलांटिक ही अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्म उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या महिनाभरातील रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलमध्ये ही तिसरी महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे. तर, जनरल अटलांटिकची ही रिलायन्स समूहातील दुसरी गुंतवणूक ठरणार आहे. यापूर्वी जनरल अटलांटिकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्येही 6,598.38 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

3675 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे जनरल अटलांटिक रिलायन्स रिटेलमधील 0.84 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मुल्य 4.28 लाख कोटी रुपये होईल. “अमेरिकेच्या जनरल अटलांटिकसोबत आमचे संबंध चांगले आहेत. या करारामुळे आमच्यातील संबंध आणखी विस्तारले याचा आनंद आहे. यामुळे भारतातील कंपनीच्या विस्ताराला आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास मदत होईल. रिलायन्स रिटेलप्रमाणेच, जनरल अटलांटिक संपूर्ण भारतासह जगभरात प्रगती आणि वाढ होण्यासाठी डिजिटल सक्षमतेच्या मूलभूत क्षमतेवर विश्वास ठेवते”, अशी प्रतिक्रिया या कराराबाबत मुकेश अंबानी यांनी दिली. तर, “रिटेल सेक्टरमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणे एक चांगली संधी आहे. जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताच्या स्थानाला अर्थपूर्णपणे गती देण्यासाठी रिलायन्स टीमबरोबर पुन्हा भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे”, असं जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड यांनी म्हटलं आहे.

गेल्या महिनाभरातील रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलमध्ये ही तिसरी महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमधील 1.75 टक्के हिस्सा 7,500  कोटी रुपयांनी खरेदी केला होता. याशिवाय अमेरिकेच्या केकेआर या कंपनीनेनेही 5 हजार 500 कोटी रूपयांना रिलायन्स रिटेलमधील 1.28 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. रिलायन्स रिटेलचे देशभरात १२ हजारांपेक्षा अधिक दुकानं असून वर्षाला 64 कोटी लोकं खरेदीसाठी येत असतात. रिलायन्स रिटेल देशभरात सर्वात मोठा आणि विकसित होणारा रिटेल व्यवसाय चालवते. सिल्वर लेक आणि केकेआरनंतर जनरल अटलांटिकने केलेली ही रिलायन्स रिटेलमधील तिसरी मोठी गुंतवणूक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General atlantic to invest rs 3675 crore in reliance retail third mega deal in a month sas
First published on: 30-09-2020 at 14:05 IST