How To Get Rid Of Pigeon From Window: या वर्षाच्या सुरुवातीला ‘हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’ चा आजार बळावयाचे प्रमाण मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण व पनवेल या महानगरपालिका क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले होते. या आजराचे मुख्य कारण हे कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतू असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही झालेल्या काही संशोधनातून श्वसन संबंधित आजार होण्याचे एक कारण कबुतर असल्याचे सुद्धा दिसून आले होते. आरोग्याच्या कारणांसह घराचा लुक खराब करण्यातही ही कबुतरं कारणीभूत ठरतात. आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे एकाच गोष्टीत तुमची दोन्ही कामं पूर्ण होतील.
कबुतरांना खिडकीत येण्यापासून रोखण्यासाठी आपण खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा तुम्ही बैठ्या घरात राहात असाल तर खिडकीच्या खाली काही रोपं लावू शकता. कबुतरांना ही रोपं म्हणजेच गंध किंवा रंग अजिबात आवडत नसल्याने यामुळे कबुतरं तुमच्या खिडकीत येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.




१) निवडुंग किंवा कोरफड: काटेरी वनस्पती खिडकीत असल्यास यामुळे कबुतरं खिडकीत येण्यास घाबरतात. यामुळे खिडकीचा लुकही सुंदर होण्यास मदत होते. त्यामुळे एखादं निवडुंगाचं छोटं रोपं ठेवू शकता.
२) डॅफोडिलीया किंवा पिवळी फुलं: कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, डॅफोडिलचे देठ, पाने आणि पाकळ्यांमध्ये लाइकोरीन नावाचे रसायन असते. हे पक्षांसाठी घातक असल्याचे पक्षी सुद्धा जाणतात त्यामुळे ते या फुलापाशी सहसा फिरकत नाहीत.
३) लसूण: तुम्ही लसणाचे रोप लावू शकता किंवा त्वरित परिणाम हवा असेल तर लसूण स्प्रे सोल्यूशन देखील बनवू शकता जे पक्ष्यांना दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी लसूण, पाणी आणि व्हिनेगर मिसळा, थोड्यावेळ नीट सर्व अर्क उतरून पाणी राहूद्या व मग कबुतरं सतत येतात अशा ठिकाणी स्प्रे करा.
४) पुदिना: पुदिन्याच्या दर्पामुळे पक्षी या पानांपासून अधिक दूर राहतात.
५) सिट्रोनेला: हिरव्यागार सिट्रोनेलाचा वापर केवळ कबुतरंच नव्हे तर माशा- मच्छर यांना दूर पळवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
याशिवाय, पक्ष्यांना चमकदार वस्तू अजिबात आवडत नाहीत कारण यातून सूर्यप्रकाश परिवर्तित होऊन त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आरसे असणारे ड्रीमकॅचर किंवा सीडी वापरलेल्या शोभेच्या वस्तू खिडकीजवळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा.