तारुण्याची अभिलाषा सर्वानाच असते. पण ते टिकवण्यासाठी लागणारे परिश्रम घेण्यास अनेकांची तयारी नसते. काही अंशी ते जनुकांवरही अवलंबून असते असे आता नव्य संशोधनातून सिद्ध होत आहे. लाल रंगाचे केस आणि निस्तेज त्वचा यासाठी कारणीभूत असलेले एमसी १ आर (जिंजर) जनुक आपण किती तरुण दिसतो यासाठीही जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेदरलँड्समधील रॉटरडॅम येथील इरॅस्मस विद्यापीठाच्या संशोधकांनी या विषयावर संशोधन केले. विविध प्रकारचे २५ निकष लावून केलेले हे संशोधन करंट बायोलॉजी या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले. २७०० वयस्क व्यक्तींच्या त्वचेचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढला की ज्यांच्या डीएनएवर ‘एमसी १ आर’ हे जनुक होते ते त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा दोन वर्षांनी तरुण दिसतात. काही लोक आपल्या वयापेक्षा तरुण दिसतात तर काही आहे त्यापेक्षा वयस्क दिसतात. त्यामागे हे जनुक हेच कारण असावे हे आता सिद्ध झाल्याचे या शोधनिबंधाचे सहलेखक डॉ. मॅनप्रेड केसर यांनी सांगितले. हेच जनुक शरीराची सूज आणि डीएनएची दुरुस्ती यासाठीही उपयुक्त असते. त्याचाही तरुण दिसण्यावर परिणाम होऊ शकतो, असे या संशोधकांना वाटते. आपण किती तरुण दिसतो यावरून आपल्या शारीरिक आणि एकंदर प्रकृतीचीही कल्पना येऊ शकते. आता तरुण दिसण्यासाठीच्या प्रयत्नांना संशोधनाचा आधार मिळू शकतो.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
‘जिंजर’ जनुकामुळे तरुण दिसण्यास मदत
तारुण्याची अभिलाषा सर्वानाच असते. पण ते टिकवण्यासाठी लागणारे परिश्रम घेण्यास अनेकांची तयारी नसते.

First published on: 04-05-2016 at 02:02 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ginger gene makes people look younger