ढापण्या, सोडा वॉटर, बॅटरी..अशा हाका पूर्वी चष्मावाल्यांना ऐकू यायच्या. शाळा, कॉलेजमध्ये तर चष्मा लावणाऱ्यांना हमखास चिडवले जाई. चष्मा लागला म्हणजे डोळे खराब झाले असे समजून त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात असे. आता मात्र चष्मा हा ‘स्टाईल आयकॉन’ झाला आहे. चष्मा नसलेलेही झिरो नंबरचा चष्मा केवळ स्टाईलसाठी बनवून घेतात. त्याचे कारण म्हणजे चष्म्याच्या तंत्रज्ञानात झालेला बदल व त्यातील आधुनिक डिझाईन्स.
टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि आता मोबाईल यामुळे डोळ्यांवर ताण येऊन अधिकाधिक जणांना चष्मा लागला आहे. त्यामुळे चष्मा ही बऱ्याच अंशी अपरिहार्य गोष्ट झाली आहे. हेच लक्षात घेऊ न कंपन्यांनी अनेक नवीन डिझाईन्सचे चष्मे बाजारात आणायला सुरवात केली. चष्मा स्टाईल स्टेटमेंट बनले. चष्मा निवडताना आपली चेहरापट्टी, केसांची रचना यांचा आधीच विचार करून फ्रेम आणि लेन्सची निवड केली तरच चष्मा हा ‘स्टाईल’ म्हणून वापरणे योग्य ठरते.
आता पुरूषांसाठी, महिलांसाठी व लहान मुलांसाठी चष्म्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यातसुद्धा तरुण, चाळिशी व साठीनंतरचे असे उपप्रकार असतात. तरुणांसाठी चष्म्याच्या अनेक स्टाईल्स आहेत. सध्या कॅटआय अर्थात मांजराच्या डोळ्यांसारखे दिसणाऱ्या फ्रेम्सला मुलींकडून पसंती मिळते आहे, तर एव्हिएटर स्टाईल्सचे चष्मे मुलांकडून घेतले जातायत. कॉलेज, पार्टी समारंभांना घालता येतील अशा ‘फंकी लूक’च्या चष्म्यांचीही मागणी वाढते आहे. काळा, मरून, तपकिरी, सोनेरी अशा रंगांच्या फ्रेम्सबरोबरच डय़ुएल कलरच्या म्हणजेच दोन रंगांच्या फ्रेम्सची स्टाईल सध्या दिसून येते. लेन्सच्या चौकटीसाठी एक रंग व काडय़ांचा दुसरा रंग असे त्याचे स्वरूप असते. मॅचिंगप्रेमींसाठी काडय़ा बदलता येणाऱ्या चष्म्यांचाही पर्याय आहे. जेणेकरून हव्या त्या रंगाच्या काडय़ा चष्म्याला लावता येतील. फ्रेमवर अक्षरे किंवा टॅटू असलेला चष्माही मिळतो. वापरायला सोप्या, हलक्या अनेक डिझाईन्स व रंग उपलब्ध असल्यामुळे धातूच्या फ्रेमपेक्षाही प्लास्टिकची फ्रेम वापरण्यावर तरुणांचा भर दिसतो. त्याशिवाय रिमलेस किंवा हाफ रिमचे चष्मेही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जाड रिमचे चष्मेही काही जण घालतात. तुमची स्टाईल जपण्यासाठी फ्रेमप्रमाणेच लेन्सचाही विचार करणे गरजेचे आहे. अँटीरिफ्लेक्शन, पोलराईज्ड असे अनेक प्रकार मिळतात. वेगवेगळ्या रंगाच्या लेन्सही मिळतात.
तुमच्या चेहेऱ्याला कोणत्या प्रकारचा चष्मा चांगला दिसेल याचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याची दुकानांकडून केली जाणारी जाहिरात फॅशनच्या बाजारातील चष्म्याचे महत्त्व दाखवून देते. कोणती फ्रेम किंवा लेन्स चेहेऱ्याला चांगली दिसते, हे घरबसल्या पाहण्याची सुविधाही काही ब्रँड्सनी उपलब्ध करून दिली आहे. चष्मा ही फॅशन अॅक्सेसरी होण्यात चित्रपटांचाही बराच हातभार आहे. गेल्या दोन तीन वर्षांत चित्रपटांमधून कलाकारांनी घातलेले चष्मे हा चर्चेचा विषय ठरला. ‘मोहोब्बते’मधील शाहरूख खान असो किंवा ‘कहो ना प्यार है’ मधील हृतिक रोशन, यांनी चष्म्याला अधिक देखणं रूप प्राप्त करून दिलं. त्यामुळेच चष्मा खरेदीसाठी डोळ्याला नंबर असायलाच हवा असं नाही!
bhagyasb@gmail.com