scorecardresearch

Premium

परकीय भाषेतही करीयरच्या अनेक संधी

जग जवळ येत असल्याने पर्याय उपलब्ध

परकीय भाषेतही करीयरच्या अनेक संधी

आपल्याला साधारणपणे आपली मातृभाषा आणि हिंदी इंग्रजीशिवाय इतर भाषा येत नाहीत. मागच्या काही वर्षात जग अतिशय वेगाने जवळ आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे परकीय भाषांमध्ये करीयरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलात तरी विविध भाषांचे ज्ञान अवगत असणे, हे एक महत्वाचे कौशल्य आहे. जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये झपाट्याने झालेली वाढ, इंटरनेट व त्याची व्याप्ती यांमुळे नोकरीसाठी उमेदवाराची निवड करताना त्याला एखादी परकीय भाषा अवगत असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य मिळते.

आजकाल बहुतांशी शाळांमध्ये सुमारे १३ ते १४ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, आणि आता तर मैंडरीन (चायनीज) सारख्या परकीय भाषा शिकविण्यास सुरुवात झाली आहे. ही स्वागतार्ह बाब असली तरीही पुढे जाऊन त्या भाषेचे पुढील शिक्षण घेणे आणि त्यात करीयर करण्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. भाषा शिकण्याने भाषेशी निगडित क्षेत्रामध्ये नोकरीच्या व व्यवसायाच्या नानाविध संधी उपलब्ध होतात आणि करिअरच्या कक्षा रुंदावतात. पाहूयात असेच काही पर्याय…

भाषांतर – विविध कंपन्यांदरम्यान किंवा निरनिराळ्या देशांच्या सरकारांदरम्यान आणि न्यायालयांमधील कामकाजांमध्ये होणाऱ्या व्यवहारांसाठी कायद्याने आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे, दस्तावेज यांचे भाषांतर करणे गरजेचे असते. यामध्ये साधारणपणे करारपत्रे, प्रतिज्ञापत्रे, पोलिसांचे अहवाल, प्रथम माहिती अहवाल (म्हणजेच एफ. आय. आर.), खटल्याचे दस्तावेज, जमीनजुमल्याचे व्यवहार, कार्यालयीन कागदपत्रे, जन्माचा दाखला, विवाहाचा दाखला, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला, मृत्यूचा दाखला, नोंदणी प्रमाणपत्र, शिधापत्रिका, पदवी व पदविका प्रमाणपत्रे यांचा समावेश होतो. याबरोबरच नवनवीन शोध, शोध निबंध व पेटंट्स यांचा व्यापक प्रमाणावर प्रसार होण्याच्या उद्देश्याने मूळ भाषेतील सामग्रीचे भाषांतर जगातील प्रमुख भाषांमध्ये करणे गरजेचे असते. यासाठी शास्त्रीय भाषांतर येणे आवश्यक असते.

संकेतस्थळांचे भाषांतर – नवनवीन बाजारपेठांमध्ये व्यवसायांची वृद्धी होण्याकरिता संकेतस्थळांचे स्थानिकीकरण करणे ही पहिली पायरी आहे. ऑनलाईन व्यवहार किंवा संपर्क करताना ग्राहक कोणत्याही परकीय/प्रांतिक भाषेपेक्षा स्वतःच्या मातृभाषेला अधिक प्राधान्य देतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सध्या एखादी वेबसाईट उघडली की त्याठिकाणी त्यावरील मजकूर इतर भाषांमध्ये दिसण्याचे पर्याय उपलब्ध असतात. हे भाषांतर करण्यासाठी सध्या मोठी मागणी आहे.

इंटरप्रिटेशन – जग जवळ आले आहे असे म्हणत असताना अनेक परदेशी कंपन्या भारतात येत आहेत. यामध्ये जपान आणि जर्मनी या देशांचा क्रमांक सर्वात आधी लागतो. या कंपन्यांचे जपानी किंवा जर्मन लोक जेव्हा भारतात भेट देतात तेव्हा त्यांना भाषेची अडचण येऊ शकते. मात्र अशावेळी ती भाषा आणि जगात सर्वत्र वापरली जाणारी इंग्रजी भाषा येत असणाऱ्या लोकांना इंटरप्रिटर म्हणून बोलविण्यात येते. विविध परिषदा, परिसंवाद, बैठका, संस्थांच्या भेटी, तांत्रिक भेटी, पर्यटन यामध्ये इंटरप्रिटरची आवश्यकता असते.

भाषा प्रशिक्षक – भाषा शिकण्याचे प्रमाण मागच्या काही काळापासून वाढले असल्याने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था, बहुद्देशीय कंपन्या, इत्यादींना विविध भाषांकरिता अनुभवी, हुशार व माहितीगार प्रशिक्षकांची नितांत आवश्यकता असते. ही गरज आणि दिवसेंदिवस वाढत जाणार असून प्रशिक्षक म्हणून तुम्हाला मागणी मिळू शकते.

तांत्रिक लेखन – तांत्रिक लेखन म्हणजे संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, विमानसंचारशास्त्र, यंत्रमानवशास्त्र (म्हणजेच रोबोटिक्स), वित्त, वैद्यकीय, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, व जैवतंत्रज्ञान अशा विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या तांत्रिक पत्रव्यवहाराचे, साहित्यसामग्रीचे आपल्याला हव्या असणाऱ्या भाषेत मांडणे. तांत्रिक लेखनासाठी भाषेवरील प्रभुत्वासोबतच प्रस्तुत क्षेत्राचे सखोल ज्ञान आणि पुरेसा अभ्यास असणे आवश्यक असते.

ब्लॉग लेखन – ब्लॉगिंगचा सोप्या भाषेतील अर्थ म्हणजे इंटरनेटवर, ऑनलाईन स्वरूपात तुम्ही स्वतःला व्यक्त करणे आणि तुमचे मत इतरांपर्यंत पोहोचविणे. बहुतांशी उद्योजकांना ब्लॉग्ज लिहावयास पुरेसा वेळ नसतो. म्हणून ते लिखाणाचे काम आऊटसोर्स करतात – म्हणजेच इतर व्यक्तीस लिहावयास देतात. पाककला ब्लॉग्ज, पर्यटन ब्लॉग, मोटारसायकली, मोबाईल इत्यादींसारख्या उत्पादनांचे तांत्रिक ब्लॉग, असा नानाविविध क्षेत्रांमध्ये ब्लॉग लिहिले जातात. ब्लॉगमुळे समुदाय निर्मिती करणे, नवीन संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे यासाठी कंपन्यांना मदत होते.

अनुवाद – अनुवाद हे सध्या मोठे क्षेत्र झाले आहे. वेगवेगळ्या भाषांमधील साहित्य स्थानिक भाषेत येण्यासाठी अनेक प्रकाशक आणि लेखक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे तुम्हाला साहित्याची आवड आणि अनुवादाची इच्छा असल्यास या क्षेत्रात खूप संधी उपलब्ध आहेत.

देवकी दातार- कुंटे

प्रमुख, लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरो, पुणे</p>

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good career opportunities in foreign languages

First published on: 18-06-2018 at 16:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×