छत्तीसगडमधील गोमची या खेडय़ातील एका शेतकऱ्याने संकरित पेरू चे उत्पादन केले असून या एका पेरूचे वजन १ किलो आहे. छत्तीसगडमध्येच त्याची निर्मिती करण्यात आली असून उत्पादकोंना त्यामुळे फायदा होत आहे. निर्यात बाजारपेठेतही या पेरूला चांगली मागणी आहे. या पेरूचे नाव ‘व्हीएनआर बिही’ असे असून तो थायलंड व भारत या दोन देशातील पेरूच्या प्रजातींचा संकर करून तयार करण्यात आला आहे. हा प्रयोग डॉ. नारायण चावडा यांनी यशस्वी केला असून  त्याची पोषक मूल्ये सेंद्रिय पेरू इतकीच आहेत. त्यात बिया कमी असून गर जास्त आहे. दूर अंतराच्या पाठवणीला हा पेरू योग्य आहे. तसेच. तो पंधरा दिवस टिकतो व प्रशीतकात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यास एक महिना राहतो, असे चावडा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या पेरूचे वजन जास्त असल्याने तो झाडावर १० ते १२ दिवस राहू शकतो. उष्णकटिबंधीय वातावरणात तो जास्त उत्पादन देतो. जेथे पाणी कमी आहे व आद्र्रता जास्त आहे तेथेही त्याचे उत्पादन घेता येते. पेरूची ही प्रजात विकसित करण्यास २-३ वर्षे लागली आहेत. चावडा यांनी पपयांची ‘विनायक ’ही प्रजात विकसित केली आहे .त्याचे गुणही व्हीएनआर बिही या पेरूप्रमाणेच जास्त पोषणमूल्ये, जास्त काळ टिकणे हे आहेत. डॉ. चावडा हे आता सीताफळाची संकरित प्रजात तयार करीत असून त्यांना कृषी क्षेत्रात व्हेजिटेबल ग्राफ्टिंग म्हणजे भाज्यांचे कलम केल्याच्या तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. जगदाळपूर या बस्तरच्या आदिवासी पट्टय़ात जमिनीचा पोत सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.
*संकरित पेरूचे निर्माते- डॉ. नारायण चावडा
*पेरूच्या प्रजातीचे नाव-व्हीएनआर बिही
*वजन- १ किलो
*टिकण्याची क्षमता – शीतपेटीशिवाय १२-१५ दिवस , शीतपेटीत-१ महिना
*वैशिष्टय़- बिया कमी, गर जास्त
*फायदा- निर्यातक्षम उत्पादन असल्याने आर्थिक  फायदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guava vnr bihi
First published on: 03-04-2015 at 01:42 IST