winter health benefits of guava : हिवाळ्यात बाजारात सहज मिळणारे पण बहुतांश वेळा दुर्लक्षित होणारे फळ म्हणजे ‘पेरू’. आपल्यातील अनेक जण चटणी-मीठ लावून पेरूचा स्वाद घेतात. पेरूचा सुगंध आणि चव मनाला तृप्त करून जाते. पण, पेरू केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. पण, चुकीच्या वेळी पेरू खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूसारख्या समस्या देखील वाढू शकतात.

जर तुम्हाला हिवाळ्यात पेरूचा फायदा शरीरासाठी करून घ्यायचा असेल तर खाण्याची योग्य वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही पेरूच्या काही सोप्या आणि आरोग्यदायी रेसिपी सुद्धा बनवू शकता; यामुळे खोकला आणि सर्दी टाळण्यास देखील मदत होईल.

तर हिवाळ्यात पेरू खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपार. कारण – हिवाळ्यात दुपार नंतर हळूहळू थंडी वाढू लागते. म्हणून संध्याकाळी पेरू खाणे टाळावे. यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढू शकतो. शिवाय, तीन विशिष्ट प्रकारे पेरू खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या सुद्धा टाळता येतात…

सॅलड – पेरूचे सॅलड आरोग्यासाठी आणि चवीसाठी दोन्हीसाठी फायदेशीर असतात. ही रेसिपी बनवण्यासाठी, पेरूचे लहान तुकडे करा आणि त्यावर काळे मीठ, साधे मीठ, चाट मसाला आणि थोडी काळी मिरी शिंपडा. तुमची इच्छा असल्यास त्यात तुम्ही इतर फळे देखील घालू शकता. यामुळे सॅलड चवीला आणखी स्वादिष्ट लागते.

चटणी – पेरूची चटणी बनवण्यासाठी फक्त पेरू भाजून घ्या आणि त्यात मीठ, पुदिना, गूळ आणि लाल तिखट घालून बारीक करा. मोहरीचे तेल घालून वाढा आणि त्याचे सेवन करा. यामुळे तुम्ही खोकला आणि सर्दीपासून मुक्त व्हाल.

लोणचं – तुम्ही पेरूचे लोणचे देखील बनवू शकता. लोणचं बनवण्यासाठी प्रथम पेरू चिरून घ्या आणि हळद घाला. एका पॅनमध्ये थोडे मोहरीचे तेल, थोडी हरभरा डाळ, लसूण आणि मीठ घाला. नंतर, ही फोडणी पेरूमध्ये मिक्स करा. नंतर, लिंबाचा रस, धणे, मेथी, बडीशेप आणि जिरे पावडर घाला. सर्वकाही मिसळल्यानंतर काही वेळ उन्हात ठेवा. काही दिवसांनी पेरूचे लोणचं खाण्यासाठी तयार होईल.