न्यूयॉर्क : लहान मुलांना ताप आल्यास त्यांना डॉक्टरकडे नेणे आवश्यक असते. मात्र काही पालक ताप आल्यावरही पाल्यावर घरीच उपचार करतात. तीनपैकी एक पालक म्हणजेच ३३ टक्के पालक मुलांचा ज्वर कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे देतात, असे अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेने केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मनाप्रमाणे पाल्याला औषध देणे अनावश्यक आहे, असे या संस्थेने सांगितले. मिशिगन विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या वैद्यकीय संस्थेतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. बहुतेक पालक १००.४ अंशापेक्षा कमी तापमान असेल तर ताप कमी करणारी औषधे देतात, ज्याची शिफारस केली जात नाही. जर ताप १००.४ आणि १०१.९ अंशांच्या दरम्यान असेल तरीही काही पालक मुलांना स्वमर्जीने औषधे देतात, तर एकचतुर्थाश पालक ताप परत येऊ नये यासाठी औषधाची दुसरी मात्राही देतात, असे या संशोधकांनी सांगितले. मुलांना जर ताप आल्यास औषध देण्याची अजिबात घाई करू नका. त्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्या, असे या संशोधकांच्या चमूचे नेतृत्व करणाऱ्या सुसान वूलफोर्ड यांनी सांगितले.