Dark Chocolate and Diabetes: चॉकलेट खायला आवडत नाही असे खूप क्वचितच असतील. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत चॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत. काहींना मिल्क चॉकलेट आवडते, तर काहींना डार्क चॉकलेट आवडते. त्यातल्या त्यात डार्क चॉकलेट खाणारे अनेक जण आहेत. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये काही पोषक तत्व असतात, जे अनेक आजारांपासून आराम देतात असं म्हटलं जातं. पण मधुमेह असलेले व्यक्ती डाॅर्क चॉकलेट खाण्याचा आनंद घेऊ शकतात का? डार्क चॉकलेट तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीसाठी खरोखर फायदेशीर ठरू शकते का, आता याच प्रश्नाचे उत्तर चेन्नई येथील डॉ. मोहन डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी दिलं असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्टर सांगतात, डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. डार्क चॉकलेटमध्ये झिंकची मात्रा सर्वाधिक आहे, जी शरीराचे ३०० एन्झाइम्स सक्रिय करते. बहुतेक चॉकलेट्स, विशेषत: दुधाचे प्रकार, साखरेने समृद्ध असतात. चरबी आणि कॅलरींनी भरलेली असतात. त्यामुळे नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने साखर आणि कॅलरीज दोन्ही वाढू शकतात आणि झटपट वजनही वाढू शकते. यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढू शकते, असे ते म्हणतात.

बरेच लोक असा युक्तिवाद करतात की, डार्क चॉकलेट्स मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुरक्षित असतात; कारण त्यांच्या साखरेचे प्रमाण कमी असते, त्यात ७० टक्के कोको असतो. परंतु, तरीही साखर जोडली जाते म्हणून सावध राहण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. याशिवाय त्यात पॉलिफेनॉल असतात, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शरीराला इन्सुलिन अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास मदत करतात, असे संशोधनात दर्शविले गेले असल्याचे, त्यांनी सांगितले आहे.

(हे ही वाचा : नारळ पाणी रोज प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं का? वाचा तज्ज्ञांचं उत्तर…)

जर HbA1c (तीन महिन्यांसाठी रक्तातील साखरेची सरासरी मोजणी) पातळी सामान्य असेल किंवा ५.७ टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि सामान्य मर्यादेत असेल, तर थोड्या प्रमाणात चॉकलेट घेतल्याने तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होऊ शकत नाही. पण, तुमची पातळी जास्त असल्यास दूर राहा, असा सल्ला डॉ. व्ही. मोहन देतात.

कोको आणि गडद चॉकलेट हे पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉल आणि कॅटेचिनसह अँटिऑक्सिडंटचे समृद्ध स्रोत म्हणून ओळखले जातात. मिल्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर विपरित परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मधुमेह असल्यास, साखरयुक्त अन्न टाळणे चांगले असल्याचे ते म्हणतात. परंतु, स्मार्ट ग्लुकोज मॉनिटरिंगसह संतुलित आहाराचा भाग म्हणून अधूनमधून एक किंवा दोन डार्क चॉकलेट खाल्ल्याने काही आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. जे लोक चॉकलेटप्रेमी आहेत, परंतु त्यांना मधुमेहाचे निदान झाले आहे, ते मधुमेहाच्या विशिष्ट पोषणाची निवड करू शकतात. 

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण काहीही अनहेल्दी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साधे घरगुती जेवण बनवून आणि योग्य आहाराची निवड करून मधुमेह नियंत्रित करणे सोपे होऊ शकते. मधुमेह असलेल्या रुग्णांना प्रत्येक पदार्थ खाण्यापूर्वी खूप काळजी घेणे आवश्यक आहे, असे डाॅक्टर नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can dark chocolate be safe for those living with diabetes find out what the experts say pdb