तो दहावीत होता. प्रिलिम्स झाल्या आणि सगळ्यांनाच परीक्षांचे आणि कॉलेजचे वेध लागले. सेंड ऑफ पार्टी झाली. शाळा सोडताना काहीतरी वेगळं करायचं असा विचार करुन या मुलाने मुख्याध्यापकांच्यासह काही शिक्षकांचे फोटो मॉर्फ केले आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या इन्स्टा पेजवर टाकले. शिवाय व्हॉट्सअप ग्रुप्समध्येही शेअर केले. बघता बघता फोटो व्हायरल झाले आणि पसरत पसरत शिक्षकांच्या पर्यंत जाऊन पोहोचले. फोटो मॉर्फिंग करताना विद्यार्थ्याने वाह्यातपणा केलेला नव्हता. पण तरीही कार्टून सारखे फोटो केले होते. काही शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना मात्र ते आवडले नाही. आपला अपमान झाला आहे असं वाटून कुणी हे फोटो बनवले याची शोधाशोध केली गेली आणि विद्यार्थी सापडला. शाळेने पोलिसात तक्रार दाखल केली. दहावीच्या मुलाची पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर पालकांचं धाबं दणाणलं. पालकांची विनंती आणि मुलाचे समुपदेशन यानंतर शाळेने तक्रार मागे घेतली. या संपूर्ण प्रकरणात आपण काहीतरी चुकीचे करतो आहोत हे त्या मुलाच्या लक्षातच आलं नसल्याचं समुपदेशकांना जाणवून गेलं. आपण जसे आपल्या समवयस्कांची मजा करतो तसंच आपण शिक्षकांबरोबर केलं आणि त्यात काय एवढं रागावण्यासारखं असंच त्या विद्यार्थ्याला बराच काळ वाटत होतं. दुसऱ्या एका घटनेत एका टीनएजर मुलीने वर्गात मैत्रिणीचं बाईंनी अधिक कौतुक केल्यामुळे मत्सरापोटी मैत्रिणीचा फोटो मॉर्फ केला. कुठलंसं मॉर्फिंग एप वापरताना तिने एका नग्न देहावर मैत्रिणीचा चेहरा लावून तो फोटो व्हायरल केला. याही प्रकरणात गोष्टी पोलिसांपर्यंत गेल्या होत्या मात्र समुपदेशन, पोलिसांची मध्यस्ती यानंतर गोष्टी निवळल्या आणि तक्रार मागे घेतली गेली. हेही वाचा. Health Special: ऋतूबदलाचा काळ आरोग्याला बाधक का ठरतो? तिसऱ्या घटनेत एक मुलगा बरेच दिवस एका मुलीला ऑनलाईन स्टॉक करत होता. तिच्या प्रत्येक फोटोवर त्याची पहिली कॉमेंट असायची, सगळ्या पोस्ट लाईक करायचा, ती जिथे जाईल तिथे जाण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस तो तिला जाऊन भेटला आणि त्याने तिला प्रपोज केलं. तिला अर्थातच त्याच्याविषयी काहीच माहिती नसल्याने तिने नकार दिला. त्याला तो नकार पचवता आला नाही आणि त्याने तिचे सोशल मीडियावरचे फोटो जे आधीच डाउनलोड केलेले होते ते मॉर्फ करुन, नग्न देहावर तिचा चेहरा चिकटवून व्हायरल केले. फोटो मॉर्फ करणं आज अतिशय सोपी गोष्ट आहे. एआयनंतर तर अधिकच सोपा प्रकार झालेला आहे. अनेक ऍप्स उपलब्ध असतात. कुणीही हे काम आज करू शकते. अशावेळी अशा पद्धतीने फोटो मॉर्फ करणं चुकीचं आहे, कायदेशीर कारवाई होऊ शकते या गोष्टी मुलांना माहिती असणं आवश्यक आहे. गंमत म्हणून, राग आला म्हणून, बदला घेण्याच्या भावनेतून टीन्स आणि तरुणांच्या हातून या गोष्टी घडतात. यासाठी मुळात आपल्या भावना हाताळायचा कशा हेही मुलांना शिकवणं आवश्यक आहे. आपल्याला राग आला, मत्सर वाटला म्हणून दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे गुन्हेगारी वृत्तीकडे जाणं असतं. मॉर्फिंग तंत्रज्ञान सोपे आहे, वापरायला आज सुलभ आहे याचा अर्थ असा नाही की ते वापरुन एखाद्याला त्रास देणं योग्य आहे. यातला फरक मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे. प्रत्येक सायबर गुन्ह्याचा तपशीलाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो माध्यम साक्षरतेपर्यंत येऊन पोहोचतो हे लक्षात घेऊया. कायदेशीर कारवाई, नियम या सगळ्या गोष्टींनी अशा प्रकरणावर आळा बसू शकतोच पण माध्यम साक्षर होणं आणि माध्यमं योग्य पद्धतीने वापरायला शिकणं ही अधिक महत्वाची गोष्टी आहे. तो शाश्वत मार्ग आहे.