If You Skip Milk & Dairy Products For 30 Days: अलीकडे व्हेगन डाएटच्या नावाखाली आहारातून दूध किंवा एकूणच दुग्धजन्य पदार्थ काढून टाकण्याचा ट्रेंड बराच व्हायरल झाला आहे. अर्थात काहींच्या बाबत लॅक्टोजची ऍलर्जी किंवा अन्य काही आरोग्य समस्या हे दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचे कारण असू शकते. आपणही समजा एक प्रयोग म्हणून आपल्या आहारातून दुग्धजन्य पदार्थ वगळण्याचा निर्णय घेतलात तर काय होईल? असं म्हणतात कोणत्याही गोष्टीचा अंदाज येण्यासाठी किमान २१ दिवस तरी त्या गोष्टीला सातत्याने करून पाहणे आवश्यक असते. आपण याही पुढे जाऊन आज १ महिना म्हणजे ३० दिवस दुग्धजन्य पदार्थ आहारातून काढून टाकण्याचे फायदे किंवा तोटे काय असतील हे पाहणार आहोत. हा प्रयोग केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आणि भावनिक पैलूंवरही परिणाम करून विविध परिणाम करू शकतो. हे परिणाम काय असतील हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


दुग्धजन्य पदार्थ टाळल्याने मिळणारे फायदे

यशोदा हॉस्पिटल्स हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ दिलीप गुडे यांनी इंडियान एक्सस्प्रेसला सांगितले की, जेव्हा आहारातून दुग्धजन्य पदार्थ काढून टाकले जातात तेव्हा एकंदरीतच शरीरात प्रवेश करणाऱ्या अतिरिक्त फॅट्स, साखर व मीठाचे प्रमाण नियंत्रणात आणले जाते. हा प्रयोग तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी केल्यास याचा प्रभाव शरीराच्या एकूण प्रणालीवर दिसून येतो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ही अतिरिक्त चरबी हृदयविकार, मधुमेह, अल्झायमर अशा आजारांमध्ये घातक ठरू शकते.

दुग्धजन्य पदार्थ टाळल्याने वजन कमी होते का?

दुग्धजन्य पदार्थ कमी केल्यावर काही लोकांना वजन कमी करण्यास मदत होते, साहजिकच डेअरी उत्पादनांमध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते व त्याचे सेवन टाळल्याने वजनावर कदाचित परिणाम दिसून येऊ शकतो पण यशोदा हॉस्पिटल्स हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार चिकित्सक आणि मधुमेहशास्त्र डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी नमूद केले की हा प्रभाव व्यक्तिपरत्वे बदलतो आणि वजन कमी करण्यासाठी अशा मार्गांवर अवलंबून राहण्यापेक्षा पोषक तत्वांची कमतरता टाळण्यासाठी संतुलित आहार राखणे महत्वाचे आहे.

दुग्धजन्य पदार्थ टाळल्याने पाचन सुधारते का?

डॉ गुप्ता पुढे सांगतात की,”दुधात लॅक्टोज हे सत्व असते ज्यांना याची ऍलर्जी असते त्यांना दुधाच्या किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने पचनात अडथळे जाणवू शकतात. शिवाय सूज येणे, गॅस होणे, अतिसार होणे असे त्रास सुद्धा यामुळे वाढू शकतात. जेव्हा अशा प्रयोगासाठी दुग्धजन्य पदार्थ टाळले जातात तेव्हा त्याचा प्रभाव पचनात झालेल्या सुधारातून दिसून येऊ शकतो. दुग्धजन्य पदार्थ आतड्याच्या मायक्रोबायोमच्या रचनेवर प्रभाव टाकतात. हे पदार्थ टाळल्याने आतड्यांतील बॅक्टेरियाचे संतुलन बदलू शकते, ज्याचे पाचन आरोग्यावर व्यक्तिपरत्वे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

डॉ गुप्ता यांच्या मते, काही अभ्यास दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आणि पुरळ यांच्यात परस्पर संबंध असल्याचे सुचवतात. दुधाचे सेवन टाळल्याने शरीरात अँटी इन्फ्लेमेंटरी सत्व वाढू शकतात तसेच हार्मोनल संतुलन सुद्धा होऊ शकते याचा परिणाम त्वचेचा पोत सुधारण्यात व त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास होऊ शकतात.

दुग्धजन्य पदार्थ टाळणार असाल तर पोषण कसे मिळवाल?

आपल्या सर्वांना माहित आहे की, दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत, हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून, त्यांचे सेवन थांबवल्याने कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने इत्यादीसारख्या पोषक तत्वांची कमतरता उद्भवू शकते. जर तुम्ही खरोखरच असा प्रयोग करणार असाल तर सोया, बदाम, टोफू, ब्रोकोली, अंजीर, सूर्यफूल बिया इत्यादि पर्यायी पदार्थांच्या वापराने ही कॅल्शियमची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे. कॅल्शियमचे इतर काही पर्यायी स्त्रोत म्हणजे पालेभाज्या आणि फोर्टिफाइड वनस्पती-आधारित दूध सुद्धा आपण विचारात घेऊ शकता.

हे ही वाचा<< रोज सकाळी ‘हा’ चहा पिऊन दिवस सुरु केल्याने शरीराला कशी मदत होते बघा; रेसिपी व फायदे दोन्ही सांगतायत तज्ज्ञ

काय लक्षात ठेवावे?

डॉ गुडे यांच्या माहितीनुसार, स्तनाचा, अंडाशयाचा आणि प्रोस्टेटचा कर्करोग असे आजार सुद्धा दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाशी निगडीत आहे. हे पदार्थ टाळल्याने चयापचय, झोप आणि स्मरणशक्ती देखील सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. काहींच्या बाबत श्वसनात, काहींना ऊर्जा वाढण्यात या प्रयोगाची मदत झाल्याचे समजते. पण पुन्हा आम्ही हेच अधोरेखित करू इच्छितो की हे परिणाम तुमच्या शरीरानुसार बदलू शकतात. असे काही प्रयोग करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skipping milk dahi butter cheese for 30 days what happens to your body if you give up dairy products for a month weight loss diseases svs
First published on: 13-02-2024 at 11:00 IST