भांगेचा (कॅनाबिज) औषध म्हणून वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आयुषतज्ज्ञांनी शनिवारी येथील ‘ओजा महोत्सवा’त केली. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वेदनाशामक म्हणून भांगेचा वापर करण्यास परवानगी मिळाल्यास भारत अशा उपचारांत क्रांती घडवू शकेल, असा दावा या तज्ज्ञांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तिसऱ्या ओजा महोत्सवाचे आयोजन निरोग स्ट्रीट (भारताचे पहिले तंत्रज्ञानयुक्त आयुर्वेद व्यासपीठ) तर्फे आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले होते. ‘सीएसआयआर-आयआयआयएम टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर’ या महोत्सवाचे सहआयोजक होते. या महोत्सवात अनेक नामवंत आयुर्वेदतज्ज्ञांनी, संशोधकांनी तसेच वैद्यांनी सध्याच्या आधुनिक उपचारपद्धतीच्या पाश्र्वभूमीवर आयुर्वेदीय उपचारांबाबत आपली मते व्यक्त केली.

‘‘सीएसआयआर-आयआयआयएम टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर, जम्मू’चे डॉ. सौरभ सरन यांनी सांगितले की, ‘‘औषधी भांगेचा (मेडिसिनल मारिजुआना) वापर करण्यासाठी लवकरच कायदेशीर परवानगी देता येईल काय, या दृष्टीने सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भांगेमध्ये कार्यरत असणारे औषधी तत्त्व शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांचे जोराचे प्रयत्न सुरू आहेत.’’

भांगेच्या औषधी वापरासाठी सरकारची मान्यता मिळालेली ‘सीएसआयआर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्टिग्रॅटिव्ह मेडिसिन’ ही पहिलीच संस्था आहे. संपूर्ण जगभरातील भांगेच्या विविध जातींवर त्यांचे संशोधन सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘‘भांगेमधील कार्यशील संयुग असलेल्या कॅनॅबिडिऑल (सीबीडी) या घटकाचे प्रमाण जास्त असेल, आणि टेट्राहायड्रो कॅनॉबिनॉल (टीएचसी) प्रमाण कमी असेल, अशा जातीचे बीज विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य लोकांसाठी वेदनाशामक म्हणून भांग उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला भांगेच्या खास जाती विकसित कराव्या लागतील. कारण या जातींची केवळ निर्यात करण्याचा आमचा हेतू नाही. वेदनेवरील उपचार आणि औषधी वापरासाठी म्हणून अशा जाती एकात्मरीत्या विकसित कराव्या लागतील,’’ असे डॉ. सरन यांनी स्पष्ट केले. वेदांमध्ये वर्णन केलल्या पाच प्रमुख औषधी वनस्पतींमध्ये भांगेचा समावेश आहे, असे ‘सीसीआरएएस’चे उपमहासंचालक डॉ. एन. श्रीकांत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemp plants medicine mpg
First published on: 11-08-2019 at 02:08 IST