भारतात दररोज १५, तर दर ९६ मिनिटाला एका व्यक्तीचा अतिरिक्त मद्यसेवनाने मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या (एनसीआरबी) ताज्या अहवालातून दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मद्यसेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे, असेही हा अहवाल सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील अनेक राज्यांमध्ये दारूबंदी असली तरी देशभरात दारूच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. २०१४ मध्ये मद्यसेवनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची सरासरी संख्या पाच होती, मात्र ती संख्या २०१५ मध्ये १५ झाली आहे. त्यावरून दारूचे अतिरिक्त सेवन वाढले असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रात सर्वाधिक दारूबळी झाले असून त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो, असा अहवाल सांगतो. गुजरात आणि नागालँड या राज्यांमध्ये दारूबंदी आहे, अशी माहितीही या अहवालात दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढली आहे. २००३-०५ मध्ये दारूचा सरासरी दरडोई वापर १.६ लिटर होता, मात्र २०१०-१२ मध्ये हे प्रमाण २.२ लिटर असा झाला आहे. जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या १६ टक्के आहे, मात्र भारतात ही संख्या ११ टक्के आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात आहे.

अनेक गुन्हे आणि अपघात हे मद्यसेवनामुळेच होतात. लैंगिक शोषण, बलात्कार आदी गुन्हे मद्याच्या अमलाखाली असणाऱ्यांकडून होत असतात, असे तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ते एस. राजू यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest death due to alcohol in maharashtra
First published on: 31-05-2016 at 02:33 IST