– डॉ. निखिल गोखले

अनेकांना पावसाळा सुरू झाला की जंतूसंसर्गामुळे घसा बसण्याचा त्रास होतो. घसा बसतो म्हणजे नेमके काय, घशाचा त्रास टाळण्यासाठी काय करावे आणि घसा बसल्यानंतर काय काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेऊ या.

diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…

घसा बसतो म्हणजे नेमके काय?
घशाला जंतूंचा संसर्ग झाल्यावर लगेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती जंतूंना मारण्यासाठी कार्य करू लागते. या प्रक्रियेत त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पांढऱ्या पेशी जमा होऊन घशाला सूज येते. सूज आल्याने घशात काहीतरी आहे असे वाटणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, आवाज बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यालाच आपण घसा बसणे असे म्हणतो. इतर काही कारणांमुळेही घसा बसू शकतो, परंतु सर्वसाधारणत: जंतूसंसर्ग हेच कारण अधिक प्रमाणात दिसून येते.

घसा बसू नये म्हणून काय कराल?

पावसाळ्यात घसा बसू नये यासाठी मुळात रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अर्थात रोगप्रतिकारशक्ती कितीही चांगली असली, तरी आजूबाजूच्या हवामानात झालेल्या बदलांमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती बळकट असेल तर त्याची तीव्रता कमी राहू शकते. नियमित व्यायाम करणे, चांगला आहार घेणे, सर्व प्रकारच्या भाज्या-फळांचा आहारात समावेश करणे, पुरेसे पाणी पिणे आणि एकूणच जीवनशैली चांगली राखणे आवश्यक आहे.

घसा बसल्यानंतर काय कराल?

घसा बसण्यावर रुग्णाला दिसणारी लक्षणे पाहून उपचार केले जातात. या काळात रुग्णाने दगदग करू नये. विश्रांती घेणे चांगले. भरपूर पाणी प्यावे, तसेच सूप, आले किंवा गवती चहा घातलेला चहा आणि इतर गरम पेये घेत राहावीत. गरम पेयांमुळे घशाला चांगला शेक मिळतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही चांगले राहते.

विषाणू संसर्गामुळे घसा दुखणे व ताप येण्यावर रुग्णाच्या प्रकृतीनुसार साधी पॅरॅसिटॅमॉलची गोळी किंवा लहान मुलांना पॅरॅसिटॅमॉलचे सिरप देता येईल. काही जण अशा वेळी ‘ब्रूफेन’च्या (आयब्यूजेसिक) गोळ्या घेतात, परंतु त्यामुळे विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता असते, असा एक अभ्यास आहे. त्यामुळे या वेळी ‘ब्रूफेन’ शक्यतो देऊ नये. ‘पॅरॅसिटॅमॉल’ अधिक चांगले.

घसा बसल्यानंतर जिवाणू संसर्गाचा संभव टाळण्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. पाणी उकळून प्यावे, बाहेरचे अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत.

घशाच्या विषाणूसंसर्गानंतर झालेला जिवाणू संसर्ग ४-५ दिवस बरा होत नसेल किंवा थोडे बरे होऊन पुन्हा वाढत असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे.

मलेरिया आणि डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येणे, घसा दुखणे, घसा खवखवणे ही लक्षणे दिसतात. परंतु नंतर लक्षणांची तीव्रता बदलत जाते. ताप खूप तीव्र असणे, अंगदुखी अतिशय वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे तापात वेळीच डॉक्टरांना दाखवणे योग्य.

काही जणांना दमट हवेत तयार होणाऱ्या बुरशीची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळेही घसा बसू शकतो. अशा व्यक्तींनी अ‍ॅलर्जी आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. घरातील व कार्यालयात भिंतींवर ओल न येऊ देणे, ओले व दमट कपडे धुतल्याशिवाय न घालणे या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

(लेखक कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत)