Digestion & Bad Breathe Remedies At Home: जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी बडीशेपच नव्हे तर वेगवेगळ्या बिया चघळण्याची पद्धत भारतीय घरांमध्ये नवीन नाही. केवळ मुखशुद्धीसाठीच नव्हे तर पचनासाठी सुद्धा या बिया मदत करतात. अशाच आजीच्या बटव्यातील बहुपयोगी बियांचं एक मिश्रण आज आपण पाहणार आहोत. पोषणतज्ज्ञ आणि डिजिटल क्रिएटर ल्यूक कौटिन्हो यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, ओवा, जिरे व बडीशेपच्या सेवनाने अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत होते. वारंवार अपचनामुळे पोटात गॅस तयार होते, पोट फुगल्यासारखे वाटणे हे त्रास कमी करण्यासाठी या बियांच्या मिश्रणाचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास असेल तरी या बिया चघळल्याने मदत होऊ शकते. ही या बियांची शक्ती आहे आणि वर्षानुवर्षे याचे सेवन करणाऱ्या भारतीयांच्या बुद्धीची शक्ती आहे.”
ओवा- जिरं – बडीशेपचं मिश्रण शरीरासाठी काय काम करतं?
या मिश्रणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचन लवकर होण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु या नैसर्गिक पर्यायामुळे कोणताही विपरीत परिणाम होत नाही. हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “या तीन बिया एक शक्तिशाली पाचक त्रिकूट तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. त्या सर्वांमध्ये कार्मिनिटिव्ह गुणधर्म असतात, यामुळे पोटातून वायू बाहेर टाकण्यास आणि सूज दूर होण्यास मदत होऊ शकते.ओव्याच्या बियांमध्ये थायमॉल असते जे एक अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असलेले संयुग आहे जे पाचक स्नायूंना आराम देते. तर जिऱ्याच्या सेवनाने पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित होते. मिश्रणातील तिसरा घटक म्हणजे बडीशेप, उच्च फायबरसह या बिया आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात .”
याव्यतिरिक्त, ओवा, जिरे, बडीशेप या मिश्रणाचे अन्यही फायदे आहेत. डॉ चक्रवर्ती यांनी नमूद केले की, “ओव्याच्या बियांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. यामुळे आतड्यांच्या हालचाली सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. जिऱ्यात अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात ज्यामुळे बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये सुद्धा अँटिऑक्सिडंट्सचा साठा असतो जो शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी फायद्याचा ठरतो. बडीशेपही तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी किती प्रभावी असते हे वेगळं सांगायला नकोच, त्यामुळे हे मिश्रण सर्वोतपरी आपल्या फायद्याचं ठरू शकतं. “
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
आता मुख्य प्रश्न म्हणजे काय खायचं हे तर ठरलं पण किती खावं हा सुद्धा मुद्दा नक्कीच विचारात घ्यायला हवा. चक्रवर्ती सांगतात, “ सर्वोत्तम प्रमाण म्हणजे प्रत्येकी १ चमचा (अंदाजे ५ ग्रॅम) ओवा, जिरे व बडीशेप एकत्र समान प्रमाणात मिसळावी. सुरुवातीला सेवन कमीच असुद्या हळूहळू प्रमाण वाढवू शकता. तुमचं शरीर याला कसं प्रतिसाद देतंय याचं निरीक्षण करा.
अनेकांना काही खाद्यपदार्थांची ऍलर्जी असते त्यामुळे आपण खालील इतर पर्यायी पदार्थांचे सेवन करू शकता.
- वेलचीच्या बिया: वेलचीच्या बियांमध्ये वातशामक गुणधर्म असतात आणि ते पचन वाढवण्यास व दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.
- आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे पचनाला मदत करतात. तुम्ही आले कच्चे, चहामध्ये किंवा अन्य पदार्थांमध्ये घालूनही वापरू शकता.
- त्रिफळा: अमलकी, बिभिटकी आणि हरितकी असलेले हे आयुर्वेदिक हर्बल मिश्रण पचन आणि आतड्यांच्या आरोग्याला चालना देऊ शकते.
ओवा- जिरं – बडीशेप कुणी खावं व कुणी खाऊ नये?
चक्रवर्ती सांगतात की, “बहुतांश लोकांसाठी हे मिश्रण सामान्यत: सुरक्षित असले तरी, तुमची काही विशिष्ठ आरोग्य स्थिती असल्यास, गर्भारपणात किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सेवन करावे. “
हे ही वाचा<< कॉमेडियन भारती सिंगवर झाली शस्त्रक्रिया; रडत सांगितली व्यथा; किडनी नव्हे तर पित्ताशयात झाले खडे, लक्षणे, कारणे वाचा
तसेच हे ही लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. ही बाब कधीही विसरू नका की या बिया संतुलित आहाराला पर्याय नाही तर जोड आहेत. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या सतत जाणवत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.