आंघोळ करताना किंवा कपडे धुताना बाथरूममध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिक किंवा स्टील यांसारख्या बादल्यांवर सतत पाण्याचे, साबणाचे शिंतोडे उडत असतात. अशा गोष्टीच्या सतत संपर्कात आल्याने बदल्यांवर प्रचंड डाग पडतात. अशा डाग पडलेल्या बादल्या जर वेळोवेळी घासल्या नाहीत तर त्याच्यावर घाणीचा थर जमा होतात. ज्यामुळे बदल्यांचा रंग बदलून बादल्या धूसर पांढऱ्या रंगाच्या दिसू लागतात.
इतकेच नव्हे तर बादल्यांचा खालचा भाग आणि बदलीची आतील बाजूदेखील सतत पाण्याच्या संपर्कात असल्याने, ती बुळबुळीत होऊन त्यावर हिरवट-काळसर रंगाचा थर जमा होऊ लागतो. मात्र आता, अशा चिवट डागांच्या बादल्या स्वच्छ कशा करायच्या असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यासाठी युट्युबवरील @Puneritadka या अकाउंटने एका व्हिडीओद्वारे स्टील आणि प्लॅस्टिक या दोन्ही प्रकारच्या बादल्या, घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून कशा स्वच्छ करता येऊ शकतात; याच्या काही अत्यंत उपयुक्त आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत, त्या पाहा.
हेही वाचा : Garden tips : गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा घरी कशा उगवायच्या? पाहा ही सोपी हॅक
प्लॅस्टिकची बादली कशी स्वच्छ करावी?
सर्वप्रथम एका जुन्या किंवा वापरात नसलेल्या बाउल वा वाटीमध्ये टॉयलेट साफ करणारे, हार्पिक घालून घ्या.
आता केसांना रंग लावणाऱ्या ब्रशच्या मदतीने किंवा दात घासायच्या ब्रशच्या सहाय्याने बाउलमधील हार्पिक, संपूर्ण बादलीला आतून आणि बाहेरून; तसेच बादलीच्या हॅण्डलला लावून घ्या.
पाच मिनिटे बादलीला लावलेले हार्पिक तसेच ठेवावे.
आता पाच मिनिटानंतर, भांडी घासण्याच्या मऊ घासणीने बादली हलक्या हाताने घासून घ्यावी.
गरज लागल्यास आवश्यकतेनुसार थोडे पाणी वापरा.
संपूर्ण बदली आतून आणि बाहेरून घासून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.
व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे बादली अगदी स्वच्छ आणि डागविरहित होऊ शकते.
स्टीलची बादली कशी स्वच्छ करावी?
साहित्य
बाउल
१ चमचा मीठ
अर्धा चमचा लिंबू सत्व किंवा अर्धे लिंबू
पाव चमचा खायचा सोडा
अर्धा कप व्हिनेगर
कोणताही साबण
काथ्या
चमचा
कृती
सर्वप्रथम एका बाउलमध्ये १ चमचा मीठ, अर्धा चमचा लिंबू सत्व, खायचा सोडा, व्हिनेगर, हे सर्व पदार्थ एकत्र करून बादली घासण्यासाठी मिश्रण तयार करून घ्यावे.
तयार केलेल्या मिश्रणामध्ये भांडी घासायचा मऊ स्क्रब भिजवून सर्व मिश्रण बदलीला आतून, बाहेरून आणि बादलीच्या खालच्या भागाला लावून घ्यावे.
मिश्रण लावल्यानंतर, पाच मिनिटांनी कपडे किंवा भांडी घासायच्या साबणाचा वापर करून, काथ्याने बादली व्यवस्थित घासून घ्यावी.
काही मिनिटांमध्येच तुम्हाला व्हिडीओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे फरक दिसू शकतो.
काथ्याच्या मदतीने बादलीवरील सर्व डाग आणि घाण घासून काढून टाकावी.
आता पाण्याच्या मदतीने बादली धुवून घ्यावी.
बदल्यांच्या कडांमध्ये अडकलेली घाण, घाणीचा थर चमच्याच्या मागील बाजूने खरवडून काढून टाका आणि काथ्याने पुन्हा घासून घ्या.
पुन्हा एकदा बदली पाण्याचे धुवून घ्यावी.
स्टीलची बादली पुन्हा आधीसारखी चमकदार आणि स्वच्छ झालेली तुम्हला दिसेल.
या उपयुक्त बाथरूम टिप्स युट्यूबवरील @Puneritadka या अकाउंटने, व्हिडीओमार्फत शेअर केलेल्या आहेत. तसेच या व्हिडीओला आत्तापर्यंत ३ लाख ७१ हजार ६७९ इतके व्ह्यूज मिळाले आहेत.