6 Simple Ways to Reduce Your AC Bill This Summer: आता मे महिना लागण्याच्या अगोदरपासूनच देशातील अनेक भागांत तापमानाचा पारा वेगाने वाढू लागलाय. विशेषत: मुंबई, नागपूर, दिल्लीसह देशातील अनेक शहरांत तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे लोकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत उष्णतेपासून वाचण्यासाठी एसी वापरणे केवळ सोईचे नाही, तर गरज बनली आहे. एकीकडे एसीमुळे दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे मात्र वाढत्या तापमानामुळे वीज बिलाचा खिशाला फटका बसत आहे. सतत एसीच्या वापरामुळे विजेचा वापर वाढतोय, ज्यामुळे महिन्याच्या शेवटी बिल पाहिल्यानंतर चिंता वाटते.
अशा वेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरात थंडपणा टिकवून ठेवण्यासह वीजबिलही नियंत्रणात ठेवू शकता. तुम्हाला उन्हाळ्यात एसीचा वापर करूनही वीजबिल कमी करायचे असेल, तर खालील सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.
१) एसीचे तापमान २४ अंशावर ठेवा
अनेकांना वाटते की, एसीचे तापमान कमी केल्याने खोली लवकर थंड होते; परंतु हा फक्त एक भ्रम आहे. संशोधनानुसार, २४ अंश तापमान शरीरासाठी सर्वांत योग्य असते. त्यामुळे एसीवर जास्त भार भार पडत नाही आणि विजेचा वापरही कमी होतो.
२) एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा
एसीची नियमितपणे सर्व्हिसिंग केल्याने त्याची कार्यक्षमता सुधारते आणि विजेचा वापरही कमी होतो. जर बरेच महिने सर्व्हिसिंग केले नाही, तर कोणत्याही मशीनचा स्पीड कमी होतो आणि विजेचा वापरही वाढतो. असेच एसीच्या बाबतीतही आहे.
३) फिल्टरच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका
एसीचा फिल्टर खूप लवकर घाण होतो. जर तो स्वच्छ नसेल, तर त्यातून कमी थंड हवा बाहेर येईल आणि मशीनवर जास्त ताण येईल. हवेचा प्रवाह चांगला राहावा यासाठी दर महिन्याला फिल्टर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
४) दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करा
एसीची थंड हवा अधिकाधिक वेळ राखण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थितपणे बंद करणे महत्त्वाचे आहे. जर बाहेरील गरम हवा घरात येत राहिली, तर एसीवर जास्त भार पडेल आणि बिलही वाढेल.
५) स्मार्ट मोड वापरा
एसीमध्ये हल्ली अनेक प्रकारचे मोड असतात; जसे की, इको मोड, फॅन मोड, ६०% पॉवर मोड. अशा प्रकारचे मोड वीजवापर कमी करतात आणि तुम्हाला थंड हवेचा अनुभव देतात. गरजेनुसार मोड बदलत राहा.
६) घर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा
घरातील दरवाजे, खिडक्यांना जाड पडदे लावा. कूलर किंवा पंख्यासह एसीचा वापर करा. त्यामुळे घरात लवकर थंड हवा पसरेल आणि पुन्हा एसी चालू करावा लागणार नाही.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही केवळ उष्णतेपासूनच आराम मिळवू शकत नाही, तर वीजबिलावरही नियंत्रण ठेवू शकता.