बारीक होण्यासाठी व्यायाम, डाएट आणि इतरही अनेक उपाय केले जातात. जंकफूड तसेच शीतपेयांमुळे लठ्ठपणा वाढतो, तसेच जेवणाच्या वेळा योग्य नसतील तरीही लठ्ठपणा वाढतो. अनेकांना शिक्षण, नोकरी यामुळे घरापासून दूर रहावे लागते. तर कधी घरी राहूनही डबा नेणे शक्य नसल्याने बाहेर खावेच लागते. आता बाहेर खाणार म्हटल्यावर आपले वजन वाढणार हे ओघानेच आले. पण बाहेरचे खाऊनही काही गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही बारीक राहू शकता. कसे ते पाहूया…

जेवणात समतोल ठेवा

बाहेर खात असाल तर ते जेवण अन्नघटकांचा समतोल ठेवणारे असेल याची काळजी घ्या. स्निग्ध पदार्थ आणि जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्नपदार्थ जेवणात नसतील याची काळजी घ्या. आहार समतोल असेल तर वजन कमी करणे सोपे होईल. त्यामुळे आहारात सूप, सॅलेड असेल असे बघा.

मागवलेले पदार्थ न लाजता बदलून घ्या

तुम्ही ऑर्डर केलेले पदार्थ आल्यानंतर ते कसे आहेत हे बघा. ते खूप तेलकट किंवा मसालेदार आहेत असे लक्षात आले तर न लाजता ते परत करा आणि दुसरी ऑर्डर मागवा. कारण तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर ती गोष्ट इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे एकतर सुरुवातीलाच आपण ऑर्डर करत असलेला पदार्थ योग्य आहे की नाही हे तपासून पाहा आणि जर ते वेळीच लक्षात आले नाही तर ऑर्डर बदलून घ्या.

वेगळ्या पर्यायांचा विचार करा

तुम्हाला चहा किंवा पाणी प्यावीशी वाटल्यास थोडे थांबून एखादे सरबत किंवा नारळपाणी घ्या. चहा किंवा कॉफीपेक्षा ते कधीही चांगले. तसेच चीज आणि बटर खावेसे वाटले तरीही आपल्या मनावर थोडा ताबा ठेऊन ते टाळा. भूक लागल्यावर सामोसा, वडा असे पदार्थ खाण्यापेक्षा ढोकळा, इडली, सँडवीच अशा पदार्थांना प्राधान्य द्या.

सावकाश खा

अनेकांना खूप भराभर खाण्याची सवय असते. मात्र ही सवयही वजन वाढण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे सावकाश प्रत्येक घास योग्य पद्धतीने चावून खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे घाई न करता खाल्ल्यास वजन वाढण्यावर निर्बंध येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीचा गांभिर्याने विचार करा.