How To Make Curd With Chilli: अनेक भारतीयांचे जेवण दह्याशिवाय पूर्ण होत नाही. काही लोक दही चपाती, पराठा, साबुदाणा खिचडी, भातासह आवर्जून दही खातात. अनेक महिला घरीच दररोज दही लावतात. परंतु, काहींना घरी दही लावणे खूप कठीण वाटते, त्यामुळे ते रोज डेअरीमधून दही विकत आणतात. परंतु, दही लावण्यासाठी सहसा दुधामध्ये एक चमचा दह्याचे विरजण घालून किण्वण प्रक्रिया केली जाते, ज्यानंतर घट्ट दही तयार होते. अनेकदा घरात दही नसेल तर विरजण लावता येत नाही; अशा वेळी एका सोप्या उपायाने तुम्ही अगदी सहज दही लावू शकता.
दही लावण्यासाठी करा मिरचीचा वापर
हिरव्या मिरच्यांच्या देठांमध्ये एक विशेष प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे दुधाचे दही करण्यास मदत करतात. हिरव्या मिरच्या गरम दुधात घातल्याने यातील बॅक्टेरिया दुधाला फर्मेंट करतात, ज्यामुळे दही बनते. यासाठी दही बनवण्यासाठी प्रथम दूध चांगले उकळून घ्या आणि हे काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ओतून ते कोमट होईपर्यंत थोडा वेळ राहू द्या. ४-५ स्वच्छ धुतलेल्या हिरव्या मिरच्या दुधात घाला आणि दूध झाकून ठेवा. हे दूध ८-१० तास तसेच राहू द्या. काही वेळाने दुधाचे दही झालेले असेल.
दही या भांड्यात कधीही लावू नका
दही लावण्यासाठी कधीही तांबे किंवा पितळेची भांडी वापरू नयेत, कारण जेव्हा या भांड्यांमध्ये दही लावले जाते तेव्हा ज्या धातूंपासून ती भांडी बनवली जातात, ती दह्याशी रासायनिक अभिक्रिया करू लागतात. अशा परिस्थितीत हे दही खाण्यासाठी योग्य राहत नाही. ते खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे दही बनवण्यासाठी स्टीलची भांडी, मातीचे भांडे किंवा काचेचे भांडे वापरू शकता.
दही खाणं आरोग्यासाठीही फायदेशीर
दही आरोग्यासाठी, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. दही खाल्ल्याने शरीराला चांगले जीवाणू मिळतात, ज्यामुळे उष्ण हवामानातही पोट निरोगी राहते. एवढेच नाही तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, बी-१२, रिबोफ्लेविनसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवतात.