छातीत होणारी जळजळ, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी मळमळ आणि तीव्र डोकेदुखीने ग्रस्थ असलेले हे रुग्ण आम्लपित्त या रोगाने अत्यंत त्रासून जातात. उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरं वाटतं. काही जणांना तर घशात बोटं घालून उलटी करावी लागते. आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आयुर्वेदिय शास्त्रज्ञांनी त्याचं स्वतंत्र रोग म्हणूनही वर्णन केलेलं आहे. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा हा रोग अनेक व्यक्तींना त्रस्त करून सोडतो. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तर हा त्रास असणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं, अतिशय आंबट खाणं, अतिप्रमाणात चहापान करणं, मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण, मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण, अतिजागरण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणं, मानसिक चिंता अशी कारणं सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते. आपली दिनचर्या नियमित ठेवावी. आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे.
आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो. आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो. आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyper acidity and ayurvedic treatment
First published on: 13-11-2013 at 03:15 IST