पारंपरिक शाखांमध्ये संशोधन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर भर; इतर देशांशीही सामंजस्य करार
भारत व मॉरिशस यांनी औषधातील पारंपरिक शाखांमध्ये सहकार्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे दोन्ही देशांना या क्षेत्रात संयुक्तपणे संशोधन करता येईल, तसेच तज्ज्ञांच्या विचारांची देवाणघेवाण करता येईल. प्रामुख्याने होमिओपॅथी व इतर पारंपरिक शाखांमध्ये सहकार्यासाठी हा करार आहे.
आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नायक यांच्या मॉरिशस दौऱ्यावेळी याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन देशांदरम्यान सांस्कृतिक बंध आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. करारानुसार तज्ज्ञांच्या विचारांची देवाणघेवाण, पारंपरिक औषधांचा पुरवठा, संयुक्त संशोधन आणि विकास यावर भर दिला जाणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आयुषअंतर्गत येणाऱ्या विविध पारंपरिक भारतीय पद्धतींचा विकास व प्रचाराचे उद्दिष्ट या कराराद्वारे ठेवण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या दृष्टीने या कराराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय वैद्यकशास्त्राचा जगभरात प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. आयुषने याखेरीज चीन, मलेशिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बांगलादेश व नेपाळबरोबर परस्पर सामंजस्य करार केला आहे. संशोधनासाठी तसेच प्रशिक्षण तसेच तज्ज्ञांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी लागतो. या करारांमुळे ते शक्य होणार आहे.
भारत व मॉरिशस यांच्यात सांस्कृतिक, भाषिक व साहित्यविषयक अनेक समान बंध आहेत. त्यामुळे पारंपरिक वैद्यकशास्त्राला चालना देताना वनौषधींची लागवड दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल काय ते पडताळून पाहिले जाईल, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. मॉरिशसला पारंपरिक औषधांची परंपरा आहे. त्यामुळे दोघांच्या दृष्टीने हा करार फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.