करोनामुळे गेल्या दीड वर्षांतील मोठा काळ टाळेबंदीत व्यतीत झाला. या काळात बहुतांश व्यवहार घरांतूनच करावे लागत होते. यासाठी ऑनलाइन माध्यमे, इंटरनेट, संगणक यांचा खूप उपयोग झाला, ही गोष्ट खरी असली तरी, त्यामुळे नागरिकांमध्ये इंटरनेटचे व्यसनही वाढू लागले आहे. ‘नॉर्टनलाइफलॉक’ या सायबर सुरक्षा कंपनीच्या जागतिक अहवालात हेच सत्य अधोरेखित झाले असून त्यानुसार करोनाकाळात भारतीयांचे ‘ऑनलाइन’ राहण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील सुमारे हजारभर नागरिकांच्या सर्वेक्षणातून निष्कर्षांप्रत आलेल्या या अहवालानुसार, यातील ८२ टक्के भारतीयांनी शिक्षण किंवा कामाव्यतिरिक्त ‘स्क्रीन’वर घालवला जाणारा वेळही वाढल्याचे मान्य केले. सर्वेक्षणातील भारतीयांनी काम किंवा शिक्षणाच्या वेळेव्यतिरिक्त दिवसातून सरासरी ४.४ तास स्क्रीनपुढे घालवले. अनेकांसाठी इतका वेळ म्हणजे जरा अतिच वेळ आहे. त्यातही स्मार्टफोनवर जास्त वेळ जात असल्याचे सहभागी भारतीयांनी मान्य केले आहे.

इंटरनेटशी जोडले गेल्याचे फायदे मान्य केले जात असले तरी, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७४ टक्के नागरिकांनी ‘ऑनलाइन’ राहण्याची सवय शरीरावर नकारात्मक परिणाम घडवत असल्याचेही नमूद केले. यातील निम्म्या जणांनी ही सवय मानसिकदृष्टय़ा त्रासदायक असल्याची कबुली दिली. टाळेबंदीदरम्यान लागलेली ही सवय मोडण्याचेही प्रयत्न अनेक जण करत आहेत. त्यात पर्यटनाला जाणे किंवा मित्रमंडळीसोबत प्रत्यक्ष गप्पांमध्ये वेळ व्यतीत करणे, असे उपाय करत असल्याचे ७६ टक्के सहभागींनी म्हटले.

‘आपण एरवी जी कामे ऑफलाइन केली असती त्यासाठी या जागतिक महासंकटाच्या काळात आपल्याला स्क्रीनवर अवलंबून राहावे लागत आहे, ही बाब ध्यानात घ्यायला हवी. मात्र, प्रत्येकाने ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन वेळेत योग्य समतोल साधायला हवा. त्यामुळे त्यांच्या आणि विशेषत: त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही,’ असे नॉर्टनलाइफलॉकचे भारत आणि सार्क देशांमधील सेल्स अ‍ॅण्ड फिल्ड मार्केटिंगचे संचालक रितेश चोप्रा म्हणाले.

बहुतांश सहभागींनी (८४ टक्के) ऑनलाइन सुरक्षेबाबत गंभीर असल्याचे म्हटले. तसेच पालकांनी आपल्या मुलांशी याबाबत नेहमी बोलले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. मात्र, मुले ऑनलाइन असताना त्यांना सुरक्षित ठेवणे कठीण असल्याचे अनेक पालक सांगतात.

‘वायफाय’ही असुरक्षित

घरोघरी इंटरनेट वापर वाढू लागल्यामुळे वायफायचा वापरही वाढू लागला आहे. वायफायसाठी बसवण्यात येणाऱ्या ‘राऊटर’चा पासवर्ड वेळोवेळी बदलल्यास वायफाय हॅक होण्याचा धोका राहात नाही. मात्र, याबाबतही भारतीय बेसावध आहेत. वायफाय राऊटर वापरणाऱ्यांपैकी ७२ टक्के जणांनी वर्षांतून एकदाच वायफायचा पासवर्ड बदलल्याचे म्हटले आहे. जेमतेम २६ टक्के वापरकर्ते दरमहा किंवा त्याहून कमी कालावधीने नियमितपणे पासवर्ड बदलतात. नऊ टक्के सहभागींनी तर वायफायचा पासवर्ड एकदाही बदलला नसल्याचे समोर आले.

पासवर्डमध्ये वैयक्तिक तपशील

इंटरनेटवरील विविध पासवर्डबाबत सातत्याने जनजागृती होत असतानाही नागरिकांमध्ये त्याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ८० टक्के जणांनी पासवर्ड म्हणून स्वत:चे, जोडीदाराचे, मुलांचे नाव, वाढदिवसाची तारीख अशा वैयक्तिक पण सहज शोधून काढता येणाऱ्या अंक किंवा अक्षरांचा वापर केल्याचे समोर आले.

गोपनीयतेबाबत साशंक

सर्वेक्षणात सहभागी भारतीयांनी ‘स्मार्ट होम’ उपकरणे आणि ती बनवणाऱ्या कंपन्यांबाबतही शंका व्यक्त केली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दर पाचपैकी दोन भारतीयांनी सुरक्षा आणि खासगीपणा जपण्यासाठी ‘स्मार्ट होम’ उपकरणे खरेदी करणे टाळल्याचे म्हटले आहे.  अशी उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांकडून आपला डेटा कसा वापरला जाईल, याची शाश्वती नसल्याने ती टाळणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्के इतके आहे. स्मार्ट उपकरणाबाबतच्या धोक्यांबाबत सजग नसलेल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशा उपकरणांवरील स्वत:ची सुरक्षा जपण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे जवळपास २२ टक्के सहभागींनी म्हटले.

‘ट्रक’चे गेमिंग ‘टीडब्ल्यूएस’

‘ट्रक’ या भारतातील बॅ्रण्डने गेम खेळत असताना दर्जेदार ध्वनीचा अनुभव देणारे ‘टीडब्ल्यूएस’ सादर केले आहेत. ‘बीटीजी १’ आणि ‘बीटीजी २’ या दोन श्रेणीतील हे इअरबड्स ईकॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. या दोन्ही उत्पादनांमध्ये वाढीव ध्वनीसाठी तंत्रज्ञान वापरण्यात आले असून आजूबाजूचा ध्वनी कमी करणारे ‘ईएनसी’ तंत्रज्ञानही यात समाविष्ट करण्यात आले आहे. यात वापरकर्त्यांना संगीत आणि गेमिंग असे दोन्ही मोड निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच दोन्ही ‘टीडब्ल्यूएस’मध्ये एकाच चार्जिगमध्ये दहा तासांचा प्लेटाइम देणारी बॅटरी आहे. सोबत देण्यात आलेल्या केसद्वारे हा प्लेटाइम ४८ तासांपर्यंत वाढवता येतो.

’ किंमत : १९९९ रुपये.

दूरचित्रसंवादासाठी ‘वयम’

कोविड काळात ऑनलाइन शिक्षण तसेच बैठकींसाठी दूरचित्रसंभाषण माध्यमांचा वापर वाढू लागल्याचे लक्षात घेऊन प्रगत व्हिडीओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोने ‘वयम्’ हे भारतीय व्हिडीओ कम्युनिकेशन अ‍ॅप बाजारात आणले आहे. सत्संग, आरती, पूजा, कीर्तन इत्यादी विविध भारतीय संकल्पनांनुसार व्हर्चुअल रूम डिझाइन करण्याच्या क्षमतेसह, हे अ‍ॅप भारतीय वापरकर्त्यांना उपयुक्त आहे. आतापर्यंत वयम्ने संघ समूहासाठी गुरुपौर्णिमा उत्सव, रूट्स२ रूट्स या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांवर भर असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकरिता आणि रामायण-गीता कथा कार्यक्रमांसह ब्रह्मकुमारींसाठी अनेक कार्यRम आयोजित केले आहेत.

‘इन्फिनिक्स’चा स्मार्ट टीव्ही

इन्फिनिक्स या कंपनीने भारतात ४० इंच आकाराचा नवीन ‘इन्फिनिक्स एक्स १’ हा अँड्रॉइड टीव्ही आणला आहे. प्रमाणित अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही, बेझल लेस एफएचडी स्Rीनसह, एचडीआर १०, एचएलजी आणि ३५० एनआयटीएस ब्राइटनेससह येत असून आयकेअर टेक्नोलॉजी समर्थित हा टीव्ही डोळय़ांना त्रासदायक असा ‘ब्लू लाइट’ हटवतो.  ‘इन्फिनिक्स एक्स१’ सीरीजमध्ये इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्स असून याद्वारे हायर बेस इफेक्टसह उत्कृष्ट ध्वनीचा अनुभव मिळतो. २४ वॉट बॉक्स सीकर्स आणि डॉल्बी ऑडिओच्या मिलापातून समृद्ध, स्पष्ट, शक्तीशाली सिनेमॅटिक सराउंड साउंड अनुभव मिळतो. अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही हा नव्या मीडियाटेक ६४ बिट क्वाड कोअर चिपसेटद्वारे समर्थित असून यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी रोमची सुविधा आङे. याद्वारे कमी ऊर्जा वापरून दर्जेदार परफॉर्मन्सची हमी मिळते.

’ किंमत : १९९९९ रुपये

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian continuous online smart phones wife service work from home ssh
First published on: 27-08-2021 at 01:07 IST