सोशल मीडियाचा वापर चुकीचा आहे, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात अशी ओरड अनेकदा केली जाते. मात्र या माध्यमाचा चांगल्या गोष्टीसाठी किंवा सूचक पद्धतीनेही वापर केला जातो. मग वेगवेगळ्या कॅम्पेनच्या माध्यमातून Metoo, Rightoopee यांसारखे कॅम्पेन मोठ्या प्रमाणात चालले. त्यानंतर आता आणखी एक कॅम्पेन सुरु झाले असून या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये देण्यात आलेला मेसेज काहीसा उपहासात्मक असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
”तुम्ही सिगारेट ओढत असाल तर प्लास्टीक पिशवी घ्या आणि ती स्वत:च्या चेहऱ्याभोवती गुंडाळा. त्यामुळे तुम्हाला सिगारेटच्या धुराचा १०० टक्के आनंद घेता येईल. जगाला त्याचा एकही टक्का धूर नको आहे.” असे यामध्ये म्हटले आहे. ”तुमचे आयुष्य कसे जगायचे हा तुमचा निर्णय आहे, पण तुम्हाला स्वत:चा जीव प्रिय नसेल तरी आम्हाला आमचा जीव प्रिय आहे.” अशी उपरोधिक टीका यामध्ये करण्यात आली आहे. सिगारेट ओढणे हे ओढणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी तर धोक्याचे असतेच मात्र या धुराचा आजुबाजूला असणाऱ्या व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यालाच पॅसिव्ह स्मोकींग असे म्हणतात. अशाप्रकारे उपहासात्मक मेसेजद्वारे सिगारेट ओढणाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत.
याबरोबरच याखाली एक तळटीपही देण्यात आली आहे. तुमचा या गोष्टीला पाठिंबा असेल तर keep smoke away Campaign चा हा मेसेज तुमच्या प्रोफाईलवर कॉपी आणि पेस्ट करा असे यामध्ये म्हटले आहे. आता या Campaign चा प्रत्यक्षात कितपत फायदा होणार माहित नाही मात्र फेसबुकवर बऱ्याच मुलींनी तो आपल्या वॉलवर लिहीला आहे. यावर असंख्य जणांनी त्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला लाईक केले आहे.