हवामान बदलाच्या समस्येमुळे जगभर अनेक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यात आता किडनीच्या (मूत्रपिंड) विकारांचीही भर पडत आहे, असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील वैद्यकीय विभागातील रिचर्ड जॉन्सन आणि जे लेमरी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने निकाराग्वातील ला इस्ला फाऊंडेशनचे जेसन ग्लेसर यांच्यासह हा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष ‘क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
या संशोधकांच्या मते जगभर हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे उष्णता वाढत आहे, पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी, विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांना आणि कामगारांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. उन्हामध्ये काम करताना ग्रामीण कामगारांना आरोग्याच्या खूपच कमी सुविधा उपलब्ध असतात. उष्मतेमुळे घामातून शरीरातील पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढलेले असते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्याने आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची फारशी सोय नसल्याने पुरेसे पाणी प्यायले जात नाही. बरेचदा उपलब्ध असलेले पाणी शुद्ध नसते. त्यातून जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीमुळे ‘हिट स्ट्रेस’ आणि ‘क्रॉनिक किडनी डिसिझेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समस्या उद्भवतात. त्यातून किडनीचे विविध आजार जडतात.
जगाच्या विविध भागांत, जेथे उष्णता जास्त आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि लेकांची क्रयशक्ती मर्यादित आहे त्या ठिकाणी असा प्रकारच्या विकारांची साथ पसरण्याचा इशारा या संशोधकांनी दिला आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि शास्त्रज्ञांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त केली आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney disorders increased by climate change
First published on: 09-05-2016 at 01:46 IST