Kidney Health: किडनी हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे अवयव आहेत. किडनी रक्त फिल्टर करण्यास, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासह अनेक महत्त्वाची कामं करते. त्यासाठीच किडनीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कधीकधी काही लोकांना किडनीच्या आजाराची सुरूवातीची लक्षणे लक्षातच येत नाहीत, मात्र रोग जसजसा वाढत जातो तशाप्रकारे शरीर काही संकेत देतं त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

जर एखाद्याला उच्च रक्तदाब, डायबिटीज, किडनी निकामी होण्याचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर त्यांना किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो. म्हणूनच किरकोळ असो वा मोठे, प्रत्येक लक्षण गांभीर्याने घेणे आणि वर्षातून एकदा तपासणी करणे महत्त्वाचे आहे. किडनीमध्ये समस्या असल्याचं एक मोठं लक्षण आहे त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

किडनीमध्ये समस्या असल्यास लघवीमध्ये काही बदल दिसून येतात.

वारंवार लघवी होणे

जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज वाटत असेल, तर ते किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होतात, तेव्हा तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते. वारंवार लघवी होण्याची इतरही कारणं असलं तरी किडनीचा आजार देखील त्याचं एक कारण असू शकतो. म्हणूनच चाचणी करणं महत्त्वाचं आहे. काहीवेळा हे पुरूषांमध्ये मूत्र संसर्ग किंवा वाढलेल्या प्रोस्टेटचे लक्षण देखील असू शकते.

लघवीतून रक्त येणे

निरोगी किडनी साधारणपणे रक्तातील कचरा फिल्टर करण्यासाठी आणि मूत्र तयार करण्यासाठी शरीरात लाल रक्तपेशी राखतात. तरीही जेव्हा किडनी फिल्टर खराब होतात तेव्हा या रक्तपेशी मूत्रात गळतात आणि त्यामुळे लघवी लाल होते. किडनीच्या आजाराचे लक्षण असण्याव्यतिरिक्त लघवीतून रक्त वाहणे हे ट्यूमर, किडनी स्टोन किंवा संसर्गाचे लक्षण देखील असू शकते.

फेसयुक्त लघवी

लघवीमध्ये जास्त प्रमाणात फेस येणे हेदेखील आजारी किडनीचे लक्षण आहे. अल्ब्युमिन हे लघवीतील एक सामान्य प्रथिन आहे आणि अंड्यांमध्ये आढळणारे देखील हेच प्रथिन आहे. त्यामुळे लघवी फेसाळल्याप्रमाणे दिसते.