Kitchen Jugaad Tips: आता सणासुदीचा महिना असताना घरी पाहुणे येणार, मेजवानीचे बेत रंगणार, अशावेळी जेवण बनवण्यात, घर स्वच्छ करण्यात मेहनत लागतेच पण त्याशिवाय घरातील भांड्यांची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीचे कष्ट वाढतात. दिवाळीच्या आधी कित्येक घरांमध्ये मांडणीवरची भांडी छान घासून-पुसून लख्ख करायची पद्धत असते. आता ही भांडी घासतानाचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही कोणता स्क्रब आणि कोणता साबण वापरताय हे सुद्धा महत्त्वाचे असते. साबणाच्या बाबत अनेकांना भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे कंपनीने कितीही मोठमोठे दावे केलेले असले किंवा अगदी तुम्हीही किती मोठ्या आकाराचा साबण आणला असला तरी काही वेळा आठवड्याभरातच हा साबण विरघळून संपतो. आज आपण याच त्रासावर सोपं उत्तर पाहणार आहोत.
सर्वात सोपं उत्तर म्हणजे मुळात तुम्ही साबण कसा ठेवता याकडे लक्ष द्या. जर तुम्ही भांडी घासून झाल्यावर साबणाच्या भांड्यातील पाणी काढून टाकत नसाल तर साहजिकच साबण पाण्यात पडून विरघळणारच त्यामुळे साबणाच्या भांड्यातील पाणी आधी बेसिनमध्ये ओतून टाका, वाटल्यास याच पाण्याने तुम्ही बेसिन सुद्धा घासून घेऊ शकता.
दुसरा उपाय म्हणजे, तुम्ही जेव्हा साबण घरी आणता तेव्हाच त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याचा डिशवॉश बनवू शकता. यासाठी तुम्ही सुरुवातीला साबणाचे काप एका वाटीत घ्या, यात मीठ व व्हिनेगर व पाणी मिसळा. मीठ व व्हिनेगरचे प्रमाण हे साबणाच्या मापाच्या १ चतुर्थांश असले तरी पुरे. मग थोड्यावेळ वाटीतील लिक्विड तसेच राहूद्या. साबण थोडा विरघळला कि एखाद्या बाटलीत हे मिश्रण भरून ठेवा, मग पुढच्या वेळी भांडी घासताना तुम्हाला साबणाच्या ऐवजी हे लिक्विड स्क्रबवर घ्यायचे आहे. आणि साधारण अर्धा लिटर पाण्याची बाटली जरी असली तरी हे मिश्रण महिनाभर आरामात टिकू शकतं.
हे ही वाचा<< Weight Loss: जंपिंग जॅक ठरेल वजन कमी करायची सोपी हॅक! डॉ. मेहतांकडून जाणून घ्या फायदे व प्रभावी पद्धत
आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं करण्यापेक्षा आम्ही थेट डिश वॉशच आणू ना? बरोबर पण काही वेळा साबणाच्या तुलनेत डिशवॉश महाग असतात शिवाय पटकन संपतात सुद्धा. त्यामुळे जर तुम्हाला घरगुती पद्धतीने डिशवॉश बनवायचा असेल तर वरील पद्धत वापरून पाहू शकता. शिवाय एक बोनस टीप म्हणजे तुमचा डिशवॉश लवकर संपत असेल किंवा भांड्यांसाठी नेमका किती लिक्विड काढून घ्यावे असा प्रश्न पडत असेल तर एका वाटीत छान डिशवॉश आणि पाण्याचं मिश्रण करून स्पंज व स्क्रबने भांडी घासा यामुळे तुमच्या लिक्विडची पण बचत होऊ शकते.
तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कळवा.