रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश व बाहेरील प्रकाशाला सामोरे गेल्याने निद्रानाशाचा धोका असतो, असे संशोधनात दिसून आले आहे. प्रकाशाचे प्रदूषण हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरते. प्रत्यक्ष लोकांवर आधारित असा हा पहिलाच प्रयोग असून यात कृत्रिम प्रकाश, बाहेरील प्रकाश यांचा माणसावर होणारा परिणाम तपासण्यात आला असता त्यात निद्रानाशाचा धोका असल्याचे दिसून आले.
अलीकडच्या काळात रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी झगमगाट असतो. तो प्रकाश जर घरात येत असेल, तर झोप विचलित होऊ शकते. बाहेरील प्रकाशाची तीव्रता जास्त असेल, तर निद्रानाशाची शक्यता जास्त असते, असे दक्षिण कोरियातील लोकांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून दिसून आले. दक्षिण कोरियातील सोल नॅशनल युनिव्हर्सिटीचे क्योंग बोक मिन यांनी सांगितले, की झोप व बाहेरील प्रकाश यांचा जवळचा संबंध असून यात प्रकाशामुळे लोकांना झोप येत नाही. ते अंथरुणावर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहतात.
शेवटी त्यांना झोप लागत नाही व सरतेशेवटी पहाट झालेली असते. यात आवाज, प्रकाश, तपमान हे घटकही निद्रानाशास कारण ठरत असतात. रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अति वापर हे प्रकाश प्रदूषण मानले जाते. त्यामुळेच आपण अनेकदा साध्या डोळ्यांनी एरवी दिसू शकणारे ग्रह बघू शकत नाही.
त्यासाठी गावाच्या बाहेर जाऊन उल्कावर्षांव पाहावा लागतो, त्यामुळे प्रकाशाचे प्रदूषण हे नित्याचेच झाले आहे. ५२,०२७ लोकांवर करण्यात आलेल्या प्रयोगात साठ वयावरील व्यक्तींचा समावेश होता. त्यात साठ टक्के महिला होत्या. यातील बहुतांश लोक हे प्रकाशाचे प्रदूषण असलेल्या भागात राहत होते व त्यांच्या वैद्यकीय उपचारात झोल्पिडेम व ट्रायझोलम ही औषधे दिसून आली.