Milk Tea and Weight Loss: आपल्या देशात अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा घेऊन करतात. काही जणांना ही सवय इतकी असते की ती सोडताही येत नाही आणि कमी सुद्धा करता येत नाही. म्हणूनच जेव्हा वजन कमी करतेवेळी आहारातील महत्त्वाचा भाग चहा सोडण्याची वेळ येते तेव्हा अनेक जण हात टेकतात. याबाबत आहारतज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा तुमच्या एकूण आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर चहा पूर्णपणे सोडून देणे गरजेचे नाही. तुम्ही तुमच्या नियमित चहाचा आनंद घेऊ शकता. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर याबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात याबाबत जाणून घेऊ…
तुम्ही तुमचा दररोजचा चहा घेण्यात काहीच अडचणी नाहीत, मात्र वजन कमी करतेवेळी चहा घेताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळणं आवश्यक आहे.
चहामधील कॅलरीज कमी करा
आहारतज्ज्ञ सांगतात की, दूध आणि साखर असलेल्या एक कप चहामध्ये अंदाजे ६० कॅलरीज असतात. फुल फॅट दुधाऐवजी टोन्ड मिल्क आणि साखरेऐवजी स्टीव्हिया सारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करून तुम्ही हे आणखी कमी करू शकता. साखरेशिवाय चहा प्यायल्याने कॅलरीज लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात.
चहासोबतचे स्नॅक्स टाळा
चहा हा फक्त समस्या नाही. उलट खरी समस्या म्हणजे तुम्ही त्यासोबत खाल्लेल्या स्नॅक्सची. चहासोबत नमकीन, रस्क आणि बिस्किटे यासारखे आरोग्यासाठी हानिकारक स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि नुकसान होऊ शकते. आहारतज्ज्ञ अशा तेलकट किंवा प्रोसेस्ड जंक फूडऐवजी मूठभर काजू, भाजलेले चणे किंवा लोटस सीड्स असे हेल्दी स्नॅक्स खाण्याचा सल्ला देतात.
चुकीच्या वेळी चहा पिणं टाळा
सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही घेऊ नये असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कारण त्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते. तसंच जेवणानंतर लगेच आणि झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा.
दिवसातून जास्त चहा पिणे टाळा
दररोज एक किंवा दोन कप पेक्षा जास्त चहा पिणे टाळा. जास्त कप चहा प्यायल्याने वजन वाढणे, चिंता, ताण, निद्रानाश आणि इतरही गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
चहा बराच वेळ उकळवू नका
बरेच जण चहा जास्त वेळ उकळवतात. त्यामुळे चहातील टॅनिनचे प्रमाण वाढते. हे अजिबातच आरोग्यदायी नाही. शिवाय जर तुम्ही चहा पिण्यापूर्वी वारंवार गरम करत असाल तर तेही थांबवा. फक्त एक किंवा दोन वेळ चहा उकळणे पुरेसे आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
