करोना व्हायरसमुळे मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याने जपानची आघाडीची ऑटोमेकर कंपनी Mitsubishi Motors Corp ने आपली लोकप्रिय ‘पजेरो’ (pajero) SUV बंद करण्याची तयारी केली आहे.
करोना महामारीचा फटका बसल्याने सलग दुसऱ्या वर्षी (सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मार्च 2021 च्या अखेरपर्यंत) मोठा तोटा होऊ शकतो, अशी घोषणा कंपनीकडून नुकतीच करण्यात आली आहे. जवळपास 1.33 अब्ज डॉलरचा फटका बसण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. 2002 नंतर म्हणजे गेल्या 18 वर्षातील मित्सूबिशाचा सर्वात जास्त तोटा असू शकतो. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने पुढील वर्षापासून पजेरो एसयूव्हीचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने पजेरोचा जपानमधील कारखानाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विक्री वाढवण्यासाठी युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटपेक्षा आशियातील मार्केटमध्ये लक्ष केंद्रीत करण्याचा कंपनीचा विचार आहे. वर्कफोर्स आणि प्रोडक्शन कमी करण्याची तयारी कंपनी करत असून 20 टक्के फिक्स्ड कॉस्ट कमी करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये तोट्यात असलेल्या डीलरशीप बंद करण्याचीही योजना आहे.