रक्ताच्या चाचण्या हा रोगनिदानाचा एक प्रमुख मार्ग आहे. यात आता वैज्ञानिकांनी सेलफोनवर आधारित असे नवे रक्तचाचणी तंत्रज्ञान विकसित केले असून त्यात लगेच निष्कर्ष मिळतात. घरी किंवा क्लिनिकमध्ये कुठेही ही चाचणी करता येते.

अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी एनझाइम लिंकड इम्युनोसबट अ‍ॅसे -एलायझा या चाचणीचे ते स्मार्टफोनवरील नवे रूप आहे. अनेकदा रुग्णांना रक्ताच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळेत जावे लागते. पण नवीन सेलफोन आधारित तंत्रज्ञानाने रक्ताची चाचणी तत्काळ करता येते.

अगदी दूरस्थ प्रदेशातही या चाचण्या शक्य असल्याने रुग्णांना त्यासाठी शहरात जावे लागणार नाही.

एलायझा तंत्रज्ञान त्यामुळे सर्वाना सहज उपलब्ध होणार आहे. एलायझा हे सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान असून त्यात प्रथिने व संप्रेरकांचे जैवरासायनिक विश्लेषण केले जाते. एचआयव्ही व लायमी डिसीज यासारख्या अनेक रोगांच्या निदानाकरिता या तंत्राचा वापर केला जातो असे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा या संस्थेतील सहायक प्राध्यापक अ‍ॅना पायत यांनी म्हटले आहे. मेलिसा म्हणजे मोबाईल एनझाइम लिंक इम्युनोसर्ॉबट अ‍ॅसे या चाचणीत महागडी यंत्रणा लागत नाही हा त्याचा फायदा आहे. त्यात प्रोजेस्टेरॉन अचूक मोजले जाते मेलिसा तंत्रात पाणी गरम करण्याचा हिटर वापरला जातो त्यात नमुन्यांचे विशिष्ट तापमान ठेवून मोबाईल प्रतिमांच्या मदतीने विश्लेषण केले जाते. लाल, हिरवा, निळा या रंगांच्या मदतीने यात विश्लेषण करतात.