आरोग्य वार्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगासने आणि पारंपरिक भारतीय औषधे यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्यांचा वापर ही काळाची गरज आहे. भारतासह जगाला निरोगी ठेवण्याचे सामथ्र्य योगासने आणि पारंपरिक भारतीय औषधे यांच्यात आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बंगळुरूजवळील जिंगणी येथे सुरू असलेल्या योगा संशोधन परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. औषधी प्रणालींमध्ये विविध स्वरूपाची दरी असून ही दरी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी औषध व्यावसायिक, सरकारी संघटना आणि उद्योजकांना केले.

येत्या काळात योगासने आणि पारंपरिक भारतीय औषधांचा जास्तीत जास्त वापर विविध माध्यमांतून केला जाईल. भारताची पारंपरिक वैद्यकीय प्रणाली ही अधिक प्रभावी आणि सर्वोत्तम आहे. त्याचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सध्याच्या आधुनिक औषध प्रणालीमुळे आरोग्य सेवेत बदल होत असून तपासणी, शोध आणि रोगाचे निदान करणे सहजशक्य झाले आहे, त्याशिवाय रोगाविषयीचे विश्लेषण करणेदेखील अधिक सुकर झाले आहे. विविध औषधे आणि लसीकरणामुळे असाध्य अशा रोगांवर विजय आणि त्याचा शोध लावण्यात यश आले आहे. पण आधुनिक औषध प्रणालीमध्येही मर्यादा असून त्याचे काही दुष्परिणामही आहेत.

आधुनिक उपचार पद्धतीसाठी लागणारे आर्थिक मूल्य पाहता पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर करण्यावर भारतासोबतच अन्य देशांनाही भर देण्याची आवश्यकता आहे, असे मोदी यांनी सांगितले.

भारतीय औषध प्रणालीची तर लोकप्रियताही वाढत आहे. योगसनांना तर आंतरराष्ट्रीय वारसापण मिळालेला आहे. त्यामुळे जगभरात भारतातील प्राचीन औषधांविषयी कमालीची उत्सुकता आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to use the traditional indian medicines
First published on: 08-01-2016 at 04:16 IST