रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी लवकर न उठणे आरोग्यास हानीकारक असून यामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्यांचे आयुर्मान रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले.  हा अभ्यास जर्नल क्रोनोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ब्रिटनमधील सरे विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समायोजित केल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये आयुर्मान दहा टक्क्यांनी कमी असल्याचा धोका आढळून आला. रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये मधुमेह, मज्जासंस्थेचा विकार, मानसिक विकारांचे प्रमाण जास्त आढळून आले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांनी शक्य असल्यास त्यांची कामे लवकर करून घ्यावीत. त्याचप्रमाणे त्यांचे जैविक घडय़ाळ दिवसाच्या वेळेप्रमाणे कसे चालेल याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांमधील जैविक घडय़ाळ त्यांच्या बाहय़ वातावरणाशी जुळत नसल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका क्रिस्टन नुटसन यांनी सांगितले. आनुवंशिकता आणि ज्या वातावरणात आपण वाढतो या दोन्ही गोष्टी आपल्या झोपेच्या सवयींवर परिणाम पाडण्यास समान भूमिका बजावतात. यावर उपाय म्हणून लोकांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night shift work is not good for health
First published on: 13-04-2018 at 02:00 IST