वाचक लेखक – response.lokprabha@expressindia.com
सुलभा वैद्य
सप्तरंगी कव्हरे घातलेल्या छोटय़ा छोटय़ा गोल, चौकोनी, त्रिकोणी उशा कोचावर आकर्षक पद्धतीने ठेवून पंचतारांकित हॉटेलांच्या लॉबिज मनोवेधक बनवलेल्या असतात.
‘खायला कोंडा आणि निजायला धोंडा’ ही आपल्याला पूर्वीपासून माहीत असलेली म्हण. पण त्याचा अर्थ हाच की निजल्यावर डोक्याखाली काही तरी हवंच. हं, आता मानेचे विकार असलेल्यांना डॉक्टरच सांगतात डोक्याखाली काही घेऊ नका म्हणून. नाही तर प्रत्येकाला उशी ही लागतेच. आता प्रत्येकाची उशीची गरज निरनिराळी असू शकते. कोणाला पातळ तर कोणाला जाड उशी लागते. कोणाला सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी लागते तर कोणाला जाड जाड तक्क्याच लागतो. एखाद वेळेस उशी नसली तर डोक्याखाली आपण हाताची घडी घेऊन झोपतो. अशी ही उशी एक प्रकारे आपली मत्रीणच असते. मनासारखी उशी मिळाली की शांत गाढ झोपेचं सुख मिळतं.
इटुकल्या पिटुकल्या बाळाच्या डोक्याखाली पण आपण मऊ मऊ चादरीची घडी ठेवतोच की. म्हणजे आपल्या जन्मापासूनच आपली या उशीशी पक्की गट्टी जमलेली असते. लहान मुलं घरात असली तर मात्र या उशांचं काही खरं नाही! रंगात आले की धबाधबा उडय़ा काय मारतात, एकमेकांशी उशांनी मारामाऱ्या काय करतात. अगदी बिचाऱ्यांना खिळखिळ्या करून टाकतात. पण एकदा का झोपण्यासाठी उशीवर डोकं टेकलं की विचारांची शृंखलाच चालू होते. भूतकाळ.. भविष्यकाळ सर्व काही सरासर सरकू लागतो. मला तर वाटतं कवी आणि लेखकांची प्रतिभाही या उशीच्या कुशीत जागृत होत असेल आणि नवनवीन कथानकांचा उगम होत असेल. प्रत्येकाच्या जीवनातील चांगले-वाईट क्षण, यश-अपयश, मान-अपमान, आनंद-सुख-दु:ख सर्व सर्व ही उशी अनुभवत असावी.
आताच बघा ना! उशीवर एखादा लघुलेख लिहावा हे मला या उशीवर विसावलं असतानाच सुचलं!
अशी ही उशी ड्रॉइंग हॉलच्या सजावटीसाठीही उपयुक्त असते बरे का! सप्तरंगी कव्हरे घातलेल्या छोटय़ा छोटय़ा गोल, चौकोनी, त्रिकोणी उशा कोचावर आकर्षक पद्धतीने ठेवून पंचतारांकित हॉटेलांच्या लॉबिज किती मनोवेधक बनवलेल्या असतात ते आपण अनुभवलं आहेच. आपल्या घराच्या सजावटीसाठी पण आपण तऱ्हेतऱ्हेच्या उशांचा वापर करतोच की. पण मन आनंदी, समाधानी, तृप्त असेल तर येणारच ना सुखनिद्रेचा अनुभव. नाही तर अस्वस्थ-व्याकूळ-चिंतित मनाचे पाझर त्या उशीलाच चिंब भिजवून टाकतात. कित्येक प्रेमीजनांच्या एकमेकांच्या आठवणीत या कुशीवरून त्या कुशीवर घालवलेल्या रात्री या उशीने पाहिल्या असतील.
‘याद में तेरी जाग जाग के हम रातभर करवटें बदलते हैं !!
करवटें बदलते रहें सारी रात हम
आपकी कसम आपकी कसम!!
हा अनुभव तर नित्याचाच असणार.
अशा विरही जनांना एक त्या उशीचाच दिलासा. त्यांची तळमळ एक ती उशीच जाणे. दिवसभराच्या कष्टांनी थकला-भागला जीव उशीवर डोकं विसावतो तेव्हा अहाहा.. त्याला स्वर्गीय सुख मिळाल्याचा आनंद होतो. दिवसभराच्या कष्टांनी दमलेल्या शरीराची ती गरजच असते. एकदा का गाढ निद्रेच्या कुशीत शिरलो की ती रात्र म्हणजे गुड नाइट होते आणि मग स्वीट ड्रिम्सचा चित्रपट सुरू होतो.
सौजन्य – लोकप्रभा