ज्या महिला गर्भधारणेदरम्यान उच्च स्निग्धांश (चरबीयुक्त) असलेला आहार घेतात, त्यांच्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढीस लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मुलांमध्ये त्यामुळे चिंता आणि नैराश्य येते, असा इशारा नव्या अभ्यासात देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च प्रमाणात स्निग्धांश असलेला आहार घेणे व मातांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण हे विकसित देशांमध्ये अधिक आहे. पुढील पिढय़ांमध्ये मानसिक आरोग्य योग्य ठेवण्याबाबत हे संशोधन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे, असे संशोधकांनी सांगितले.

अमेरिकेच्या ओरोगॉन हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक एलिनोर सुलिवन यांनी याबाबत माहिती दिली. महिलांनी गर्भधारणेदरम्यान अति प्रमाणात चरबीयुक्त आहार घेणे आणि पुढील पिढीमध्ये त्याचा काय परिणाम होतो, याबाबत हे संशोधन करण्यात आले.

जगभरात मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेल्या मानसिक आजाराचा आणि उच्च स्निग्धांश असलेला आहार गर्भधारणेदरम्यान घेतल्याने काय परिणाम होतो याबाबत हे पहिलेच संशोधन होते.

हा अहवाल मातांना दोष देण्याबद्दल नाही. गर्भधारणेदरम्यान महिलांनी धोका असणारा उच्च स्निग्धांशयुक्त आहार घेऊ नये यासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. यासाठी महिलांच्या कुटुंबीयांनाही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य आहार यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक ती सार्वजनिक धोरणे निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्यासासाठी ६५ महिलांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये त्यांचे दोन गट निर्माण करण्यात आले. एका गटाला उच्च स्निग्धांश असलेला आहार देण्यात आला, तर एका गटास गर्भधारणेदरम्यान नियंत्रित आहार देण्यात आला.

यानंतर त्यांच्या पिढीतील मुलांची वर्तणूक, चिंता करणे आणि नैराश्य यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या महिलांनी गर्भधारणेदरम्यान उच्च स्निग्धांशयुक्त आहार घेतला होता, त्यांच्या मुलांमध्ये इतर मुलांच्या तुलनेत चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात आढळून आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnancy time high fat diet
First published on: 23-07-2017 at 02:54 IST