भारतीय संशोधकांचा दावा
‘मेक इन इंडिया’ या मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या नवनवीन संशोधनाची फलश्रुती म्हणूनच जगभरात थैमान घातलेल्या ‘झिका’ या संसर्गजन्य रोगाचा प्रार्दुभाव रोखणाऱ्या औषधाची निर्मिती केल्याचा दावा हैद्राबाद येथील संशोधकांनी केला आहे.
जागतिक आरोग्य विभागाने झिका आणि त्यातून उद्भवणारे दोष ही जागतिक आपत्ती असल्याचे घोषित केले आहे. लॅटिन अमेरिकेतील २० पेक्षा जास्त देशांमध्ये या रोगाचा प्रार्दुभाव झपाटय़ाने होत आहे. अमेरिकेतील टेक्सास शहरात दुर्मीळ स्वरूपाच्या झिका रोगाचा प्रार्दुभाव हा शारीरिक संबंधातून देखील होत असल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरातील विविध कंपन्याकडून या रोगाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि त्यावरील औषधाच्या निर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, पण हैद्राबादमधील ‘भारत बायोटेक आंतरराष्ट्रीय लि.’ कंपनीने मात्र ‘झिका’ या रोगावरील प्रतिबंधात्मक औषधाचा पेटंट असल्याचा दावा केला आहे.
‘झिका’ या रोगाला प्रतिबंध करणाऱ्या औषधांची निर्मिती करणारी जगातील एकमेव कंपनी असून नऊ महिन्यांपूर्वीच या औषधाचा पेटंटसाठी प्रयत्न सुरू केल्याचे भारत बायोटेक लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इला यांनी सांगितले. या वेळी ‘झिका’ या संसर्गजन्य रोगजंतूंची अधिकृतपणे आयात करताना दोन पद्धतीच्या औषधांची निर्मिती हैद्राबाद येथील कंपनीने केली आहे. मात्र प्राणी आणि मनुष्यावरील त्याचा वापर करण्यासाठीचा मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय आरोग्य परिषद संशोधनाच्या (आयसीएमआर) सहकार्यातून पुढील टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत डॉ. इला यांनी व्यक्त केले.
भारत बायोटेक लि.ने ‘झिका’ रोगाला प्रतिबंध करणारे औषध असल्याचे कळविले आहे. त्याचे विविध प्रकारच्या वैज्ञानिक पातळीवर परीक्षण केल्यानंतरच त्याचा उपयोग व्यवहारात होऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात येईल. पण भारतीय कंपनीने केलेला हा दावा निश्चितच समाधानकारक असल्याचे मत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.
डॉ. इला यांच्या मतानुसार, सध्याच्या परिस्थितीत चार महिन्याच्या कालावधीत साधारण एक अब्ज औषधाची निर्मिती करण्याची क्षमता कंपनीची आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे प्रयत्न सुरू असून नियामक मंडळाच्या आवश्यक परवानग्या जलदगतीने मिळल्यानंतरच या औषधांचा फायदा ब्राझील आणि बीआरआयसीएसचे सदस्य असणाऱ्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांनाही होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preventive drug production on zika virus
First published on: 04-02-2016 at 01:41 IST