मोदी सरकारने व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी आधार कार्ड तुमच्या बँक खात्यांशी आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करावा असे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिला. ३१ डिसेंबरपर्यंत बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक न झाल्यास तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रांझॅक्शन होणार नाही, त्यामुळे वेळेत आधारकार्ड लिंक करा असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले. आता यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया आपण केलेली असली तरीही प्रत्यक्षात हे काम झाले आहे की नाही, हे समजण्यासाठी सरकारने आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एका क्लीकवर ही गोष्ट तुम्हाला तपासता येणार आहे.
तुमच्या मोबाईलवरून *99*99# कोड डायल करा. स्क्रीनवर काही सूचना येतील. त्यानुसार तुम्हाला पुढील माहितीसाठी १ क्रमांक डायल करायचा आहे. त्यानंतर तुमचा आधारकार्ड क्रमांक विचारला जाईल. तो टाकल्यानंतर तुम्हाला आलेला सिक्रेट कोड डायल केल्यास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर सारी माहिती दिसेल. तुमचा क्रमांक बॅंक खात्याशी लिंक आहे की नाही हे त्यानंतर मोबाईल स्क्रीनवर समजेल. मात्र यासाठी आधारकार्डच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस मोबाईल क्रमांक दिलेला असायला हवा.
मोबाईल आणि आधार कार्डाचं लिकिंगदेखील ऑनलाईन करता येणार आहे. तुम्ही आधारकार्ड काढताना तुमचा मोबाईल क्रमांक द्यायला विसरले असाल तर १ डिसेंबरपासून त्याची प्रक्रिया तुम्हाला घरबसल्या करता येणार आहे. यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असेल त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधारला लिंक नसेल तर तो वेळेत करुन घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.