लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम पबजीच्या इंडियन व्हर्जन PUBG Mobile India ची आतुरतेने वाट बघणाऱ्यांसाठी बॅड न्यूज आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या गेमला भारतात लाँच करण्याची परवानगी दिली नाहीये. पबजी मोबाईल गेम भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे का?’ असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारण्यात आला होता. त्यावर मंत्रालयाने परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पबजी मोबाइल इंडियाच्या लाँचिंगबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे दोन आरटीआय दाखल झाल्या होत्या. MediaNama आणि GEM Esports यांनी दाखल केलेल्या आरटीआयद्वारे, सरकारने Krafton किंवा त्याची सहायक PUBG Corporation यांना पबजी मोबाइल इंडिया गेम भारतात लाँचिंगसाठी परवानगी दिली आहे का अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर मंत्रालयाने PUBG / PUBG Mobile India ला लाँचिंगसाठी परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात PUBG Mobile India च्या लाँचिंगची घोषणा झाल्यापासून हा गेम बराच चर्चेत आहे. गेमबाबतचे अनेक रिपोर्ट्स सतत समोर येत आहेत. पण, आता सरकारने आरटीआयमध्ये दिलेलं उत्तर गेमच्या चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे.

सप्टेंबरमध्ये घातली बंदी :-
केंद्र सरकारने या वर्षी सप्टेंबरमध्ये देशात PUBG Mobile सहीत 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. चीनसोबत सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. बॅन लागल्यापासून पबजी कॉर्पोरेशन भारतात या बॅटल रॉयल गेमच्या पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे.