शरीरात पाणी साठून राहणे ही एक समस्या आहे. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया, शरीरातील पेशी आणि इतर गोष्टींना अडथळा निर्माण होतो. शरीरातील जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला असतो असे म्हणत असतानाच या पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले तर ते धोक्याचे असते. आता शरीरात पाणी नेमके असते कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर शरीरातील रक्त, हाडे, स्नायू आणि विविध अवयवांमध्ये हे पाणी असते. शरीराची क्रिया योग्यरितीने होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र काहीवेळा हे पाणी जास्त प्रमाणात साचल्याने त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो. अशावेळी विनाकारण एखाद्या अवयवाला सूज येणे किंवा शरीराचा एखादा भाग दुखणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. काही वेळासाठी शरीरातील एखाद्या भागात पाणी साठणे ठीक आहे. त्याचा म्हणावा तितका त्रासही होत नाही मात्र हे पाणी दिर्घकाळासाठी साठून राहणे धोक्याचे असते. आता हे पाणी साठण्यामागची नेमकी कारणे काय आहेत ते पाहूया…

१. आहार

मीठ हा आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पदार्थाला चव आणण्यासाठी तसेच शरीरातील क्रिया सुरळीत चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण आपल्याला उत्तम आरोग्यासाठी मीठ कमी प्रमाणात गरजेचे असते. मात्र आपण जास्त प्रमाणात मीठ खातो आणि त्यामुळे शरीरात पाणी साठून राहते. यामुळे नकळत वजन वाढण्यास सुरुवात होते.

काय कराल – आहारातील मीठाचे प्रमाण कमी करावे. दिवसभरात एक टेबल स्पून मीठ पुरेसे असते. याला आणखी एक पर्याय म्हणजे आहारात औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर वाढवणे. यामध्ये काही प्रमाणात व्हिनेगर, लिंबाचा रस, कांदा, लसूण, आले, मिरपूड यांचा वापर करु शकतो.

२. जीवनशैली

दिर्घकाळ बसून राहणे किंवा उभे राहणे शरीरात पाणी साठण्याचे आणखी एक कारण असू शकते. याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो जो तुम्हाला सहज दिसूनही येऊ शकतो. टाचांना आणि पायांना सूज येणे ही त्याची लक्षणे आहेत.

काय कराल – तुम्हाला तुमच्या नोकरीमुळे दिवसभर बसून रहावे लागत असेल तर ठराविक काळाने ब्रेक घेणे गरजेचे असते. यामध्ये ऑफीसमधून बाहेर जात एक राऊंड मारुन यावा. हे करताना लिफ्टचा वापर न करता जिन्यांचा वापर करावा. आठवड्यातून तीन वेळा १५ मिनिटे ते ३० मिनिटे इतका वेळ व्यायाम करणे गरजेचे आहे.

३. औषधोपचार

काही औषधे शरीरात पाणी साठून राहण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये मुख्यतः मानसिक आजारांची औषधे, केमोथेरपी, रक्तदाबावरील औषधांचा समावेश असतो. त्यामुळे तुम्ही कोणती औषधे घेत असाल तर ते वेळीच समजून घ्या.

काय कराल – तुमच्या डॉक्टरांशी औषधांबद्दल बोलून योग्य ती माहिती करुन घ्या. शरीराच्या कोणत्या भागावर सूज आली असल्यास डॉक्टरांशी वेळीच त्याबाबत सल्लामसलत करा.

४. हार्मोन

ज्या महिलांना लवकर मेनोपॉज येतो त्यांच्यामध्ये सूज येण्याचे प्रमाण जास्त असते. मेनोपॉजमुळे पाणी साठणे, आतड्यांच्या तक्रारी आणि पित्त यांसारखे त्रास होतात. शरीरातील इस्ट्रोजनची पातळी कमी किंवा जास्त झाल्यास शरीरात पाणी साचण्याची शक्यता असते.

काय कराल – ज्या आहारमुळे गॅसेस किंवा सूज येते तो आहार बदला. त्यानेही तुमची शरीरात पाणी साठण्याची समस्या कमी होत नसल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. यावर वेळीच योग्य ते उपाय होणे आवश्यक असते.