रिलायन्स जिओवर आतापर्यंत व्हॉईस कॉलिंग फ्री होते. फक्त इंटरनेट पॅक रिचार्ज करण्याचे पैसे भरावे लागायचे. पण यापुढे प्रतिस्पर्धी कंपनीच्या फोन नेटवर्कवर व्हॉईस कॉल केल्यास रिलायन्स जिओ प्रति मिनिटासाठी ६ पैसे आकारणार आहे. रिलायन्स जिओकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत पूर्णपणे फ्री असलेली व्हॉईस कॉलिंगची सुविधा संपुष्टात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स जिओ पैसे आकारण्याच्या मोबदल्यात ग्राहकांना तितक्याच किंमतीचा फ्री डाटा देणार आहे. जिओच्या मोबाइल ग्राहकांनी प्रतिस्पर्धी कंपनीच्या नेटवर्कवर फोन केल्यास जिओला त्या कंपनीला पैसे द्यावे लागतात. हे जो पर्यंत सुरु राहिल तो पर्यंत प्रति मिनिटासाठी ६ पैसे भरावे लागतील असे जिओकडून सांगण्यात आले आहे.

जिओ ग्राहकांनी दुसऱ्या जिओ मोबाइल, लँडलाइन, व्हॉट्स अॅप, फेस टाइमवर फोन केल्यास हे पैसे आकारले जाणार नाहीत. सर्व नेटवर्कचे इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत असतील. त्यावर कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असे जिओकडून स्पष्ट करण्यात आले.

दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ट्रायने २०१७ साली इंटरकनेक्ट युसेज चार्ज (आययूसी) प्रति मिनिट १४ पैशांवरुन ६ पैशांवर आणला होता. जानेवारी २०२० पर्यंत हा चार्ज बंद करण्याचे ट्रायचे उद्दिष्टय होते. जिओ नेटवर्कवर व्हॉइस कॉल्स पूर्णपणे मोफत असल्यामुळे आतापर्यंत कंपनीला भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडीया या प्रतिस्पर्धी कंपन्यांना १३,५०० कोटी रुपये भरावे लागले.

आता हा भार जिओने ग्राहकांच्या माथी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल, व्होडाफोन किंवा अन्य नेटवर्कवर फोन केल्यास प्रतिमिनिटासाठी आता सहापैसे आकारले जातील. जिओ ग्राहकांना पहिल्यांदाच व्हाईस कॉल्ससाठी पैसे भरावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio to charge for voice calls dmp
First published on: 09-10-2019 at 18:18 IST