5G इंटरनेटच्या मदतीने चालणारी जगातील पहिली रिमोट कंट्रोल फाईव्ह जी कार वोडाफोन, सॅमसंग आणि डेसिग्नेटेड ड्रायव्हर या तीन कंपन्यांनी मिळून तयार केली आहे. सध्या अत्यंत वेगवान असलेल्या 5 जी इंटरनेटची चर्चा आहे. इंटरनेटची पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5Gच्या मदतीने आपण एका सेकंदाला चक्क २० GB डेटा ट्रान्सफर करता येऊ शकतो असं संगणक तज्ज्ञ सांगतात. इंग्लंडमधल्या गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये सादर करण्यात आलेली ही कार शेकडो मैलावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रित करता येते.

ही कार लिंकन एमकेआयवर आधारीत असून या कारमध्ये डेसिग्नेटेड ड्रायव्हर टेलीऑपरेशन या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. तसेच या कारसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस १० फाईव्ह जी व सॅमसंग व्हीआर हँडसेटचा वापर करण्यात आला असून या सगळ्यांना व्होडाफोनच्या फाईव्ह जी नेटवर्कने जोडण्यात आलेलं आहे. ड्रिफ्ट रेसिंग चँपियन वाँग गिटीन ज्युनिअर याने गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये या कारचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याने ही पहिली व्हर्च्युअल रिअलिटी कार रिमोटच्या मदतीने चालवली. या कारमध्ये सहा स्क्रीन, कार कंट्रोल करण्यासाठी स्टीअरिंग व्हील व पॅडल सिस्टीम दिली गेली आहे.

वाहन उद्योग क्षेत्रात एमजी हेक्टर आणि हुंदाई व्हेन्यू या दोन विद्युत कार चर्चेत होत्या. मात्र, इंडरनेटच्या माध्यमातून रिमोटवर चालणाऱ्या कारची कारप्रेमींना उत्सुकता होती. आणि इतरांच्या आधी वोडाफोन, सॅमसंग आणि डेझीनेटेड ड्रायव्हर या तीन कंपन्यांनी एकत्र येत अद्यायावत तंत्रज्ञान व इंटरनेटचा योग्य वापर करत रिमोट कंट्रोल फाईव्ह जी कार तयार करून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.