सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या त्रासापासून दूर राहायचे असल्यास आधीपासूनच प्रयत्न करायला हवेत. योगशास्त्रात त्यावरील अतिशय उत्तम असे उपाय आहेत. हे शयनस्थितील आसन आहे. या आसनाचा संबंध सरळ हृदयाशी येतो त्यामुळे त्याला हृदयस्तंभासन म्हणतात. हे आसन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
प्रथम मऊ चादरीवर शयनस्थिती घ्यावी, मग दोन्ही हात लांब करून हात आणि डोके उचलावे, त्याचप्रमाणे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायही उचलावे. साधारण जमिनीपासून एक फुटापर्यंत डोके, हातपाय उचलण्याचा प्रयत्न करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसनस्थितीत संथ श्वसन करावे. आसनावस्थेमध्ये दृष्टी हृदयस्थानावर एकाग्र करावी. याठिकाणचे स्नायू ढिले सोडावेत. जेवढा वेळ टिकवता येईल तेवढा वेळ टिकवावे, कालावधी पंधरा सेंकद चांगला. मात्र हा कालावधी सरावाने वाढवता येतो.
या आसनाची स्थिती सोडताना श्वास घेत घेत हळूहळू हात-पाय, डोके पूर्वस्थितीत न्यावेत. या आसनाचे अनेक फायदे आहेत. हृदय मजबूत होते, छाती, मान, पाठ, यांच्या विकारांवर हे आसन लाभदायक आहे. हे आसन नियमित करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी असते. या आसनाने मेद घटतो, अवाजवी चरबी वाढत नाही. स्त्रियांनी हे आसन मासिकपाळीत तसेच गर्भावस्थेत करू नये. आपले हृदय मजबूत रहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु नुसते वाटून उपयोग नाही तर त्यासाठी रोज हृदयस्तंभासन नियमित केले पाहिजे.

उच्च रक्तदाब , तसेच दमा असलेल्यांनी हे आसन डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नये. मधुमेहींनी हे आसन जरूर करावे कारण हातापायांना चांगला ताण येतो व शर्करा नियंत्रणास मदत होते. मुख्यत्वे हृदयविकार टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच हृदयस्तंभासन करणे आवश्यक आहे.

 

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rudaystambhasan yogasan good for heart
First published on: 19-10-2017 at 15:50 IST