स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘जामा सायकिअ‍ॅट्री’ नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात त्याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.  स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांचे आयुर्मान अन्य सामान्य व्यक्तींच्या तुलनेत कमी असते हे यापूर्वी माहिती होते. त्यासाठी हृदयविकार, स्ट्रोक किंवा मधुमेह अशी शारीरिक आजाराची कारणे असतात. सामान्यत: स्किझोफ्रेनियामुळे घटलेल्या शारीरिक क्रिया आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा धोका असल्याचे आजवर वैज्ञानिक समजत होते. पण लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासात असे दिसून आले, की स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांनी व्यायामाच्या जोरावर बैठय़ा जीवनशैलीवर मात केली तरीही त्यांना टाइप-२ प्रकारच्या मधुमेहाचा धोका असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी शास्त्रज्ञांनी स्किझोफ्रेनिया असलेले ७३१ रुग्ण आणि ६१४ सामान्य व्यक्ती यांच्यावर अभ्यास केला. त्यांच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर असे दिसून आले की स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांच्या जेवणापूर्वीच्या रक्ताच्या नमुन्यांत सामान्य व्यक्तींपेक्षा शर्करेचे प्रमाण अधिक होते. हे मधुमेहाचे लक्षण मानले जाते. म्हणजेच स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहाचा धोका अधिक होता.  त्यानंतर स्किझोफ्रेनिया असलेल्या, पण नियमित व्यायाम करणाऱ्या रुग्णांच्या रक्ताचे नमुनेही घेऊन ते अभ्यासण्यात आले. त्यातही सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक रक्तशर्करा आढळून आली. त्यावरून असे सिद्ध झाले की मधुमेहाचा संबंध केवळ बैठय़ा जीवनशैलीशी नाही तर थेट स्किझोफ्रेनियाशीही आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schizophrenia and diabetes
First published on: 15-01-2017 at 00:35 IST