डॉ.अमोल देशमुख

स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मनाचा आणि मेंदूचा आजार आहे. जगभरात २० दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. यात व्यक्तीचे विचार भावना व वागणूक यांचा एकमेकांशी असमतोल आढळतो. यात व्यक्तीचे स्वत:चे एक आभासी विश्व असते आणि तेच सत्य मानून त्या निगडितच त्याचे वर्तन असते. सामान्यत: आयुष्याच्या कालावधीत शंभरातून एका व्यक्तीस हा आजार होतो.  साधारणपणे १५ ते २० या वयोगटात हा आजार सुरू होतो.

लक्षणांमध्ये प्रामुख्याने संशय किंवा भ्रम दिसून येतात. इतर लोक आपल्याबद्दल बोलताय, कारस्थान करताय,आपल्यावर लक्ष ठेवताय, मारण्याचा प्रयत्न करताय, लोक आपले विचार नियंत्रित करताय, असे सतत वाटत असते. भास होणे यामध्ये व्यक्तीला इतरांचे आवाज ऐकू येण्याचे भास होतात. घाण किंवा उग्र वास येणे, अंगावर जंतू चालणे असे भास होत असतात. असंगत विचार व वर्तन यात रुग्णास स्वत:चे विचार सुसंगतपणे व्यक्त करण्यास अडचणी येतात. स्वत:ची स्वच्छता न ठेवणे, थुंकणे, गलिच्छ राहणे, शिवीगाळ करणे, आक्रमक होणे हेही लक्षण दिसतात. नकारात्मक लक्षणांमध्ये भावनिक कोरडेपणा, कामात लक्ष न लागणे, लोकांमध्ये जाण्यास टाळणे, झोप व भूक मंदावणे, आपल्याला काहीच आजार नाही हे लक्षण किंवा याची जाणीव व्यक्तीस नसते.

हा आजार होण्यामागे एक असे ठोस कारण नाही. पण जैविक, मानसिक, सामाजिक घटक एकत्रितपणे यांसाठी कारणीभूत असतात. जनुकीय कारणात अनुवंशिकता म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस आजार असल्यास मुलांना आजार होण्याची शक्यता वाढते. जीव-रासायनिक बदल व मेंदूच्या रचनेत होणारे बदल मुख्यत: कारणीभूत असतात. मेंदूच्या विशिष्ट भागात डोपामाईन या रसायनांमध्ये प्रचंड वाढ होते. मानसिक दुर्बलता, संशयी स्वभाव, लहान वयातील तणावपूर्ण घटना, प्रेम, नातेसंबंध, परीक्षा, व्यवसायामध्ये अपयश, व्यसन आणि शहरीकरण ही प्रामुख्याने आढळणारी कारणे आहेत.

स्किझोफ्रेनिया हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे. औषधोपचार  व समुपदेशनाने स्किझोफ्रेनिया नियंत्रित ठेवता येतो. आजार आटोक्यात आणण्यासाठी औषधाशिवाय दुसरा पर्याय नाही. औषधोपचारामध्ये मेंदूची रचना व कार्य पूर्ववत करण्यासाठी आणि रासायनिक बदल संतुलित करण्यासाठी औषधोपचार गरजेचा आहे. तीव्र स्वरूपाच्या आजारात ईसीटी म्हणजेच विद्युत उपचार पद्धती वापरली जाते. ईसीटी ही सर्वात प्रभावी व वेदनारहित उपचार पद्धती आहे. एक ते दोन आठवडय़ांत रुग्णाला ईसीटीने फरक दिसून येतो. औषधांमुळे आजाराची लक्षणे आटोक्यात आणल्यावर समुपदेशनाद्वारे मनोसामाजिक समस्यांवर काम करण्यास मदत होते. पुनर्वसनाने आजारी व्यक्तीची कौशल्ये पुनस्र्थापित करण्यास मदत होईल.

डॉक्टरांना नियमित भेटणे, औषधे नियमित देणे, रुग्णामध्ये रस घेणे, त्याचे कौतुक करणे आणि योग्य संवाद साधणे हा कुटुंबीयांचा उपचारात असलेला सहभाग आहे. टीका न करणे, मस्करी न करणे, चिडणे, हिणवणे आदी गोष्टी टाळणे गरजेचे आहे. कुटुंबीयांना रुग्णाची काळजी घेताना स्वत:ची पण काळजी घेणे गरजेचे आहे. नातेवाईकांनी रुग्णाच्या आजाराचा स्वीकार आणि ताणतणाव नियंत्रणाची कौशल्ये वापरणे महत्त्वाचे ठरते. अधिक शंकानिरसनासाठी आणि उपचारासाठी मनोविकार तज्ज्ञ आणि समुपदेशकांना भेटणे अत्यावश्यक आहे. या माध्यमातून समाजात या आजाराविषयी प्रबोधन करण्यास मदत होईल.